Aurangabad: औरंगाबादेत गुन्हेगारांची हिम्मत वाढली! पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप केली व्हायरल
Aurangabad Crime News: आरोपीने पोलिसांना शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप स्वतःच्या सोशल मीडियावर व्हायरल देखील केली आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) गुन्हेगारी वाढली असल्याचे चित्र असताना, आता गुन्हेगारांची हिम्मत देखील वाढली आहे. चोरी, दारू, वेश्याव्यवसाय, जाळपोळ असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने चक्क एका पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून थेट शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप स्वतःच्या सोशल मीडियावर व्हायरल देखील केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून, त्याला ताब्यात घेतले आहे. पण या घटनेवरून औरंगाबाद पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जीवन केसरसिंग जारवाल राजपूत (वय 24 वर्षे, रा. बेंबल्याची वाडी, ता. औरंगाबाद) असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे.
आरोपी जीवन राजपूत हा जाळपोळ आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याने एक हॉटेल जाळले होते. तसेच इतरही काही गुन्ह्यांमध्ये चिकलठाणा पोलिसांना जीवन हवा होता. पोलिस आल्याची माहिती समजताच तो प्रत्येकवेळी पळून जात होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी चिकलठाणा पोलिसांचे एक पथक हद्दीमध्ये जीवन राजपूतचा शोध घेत होते. तेव्हा एका ठिकाणी त्याचा साथीदार पोलिसांना आढळला. त्याच्याकडे चौकशी करीत असतानाच त्या साथीदाराने राजपूत यास फोन लावून दिला. तेव्हा त्याने पोलिस अधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ केली. तसेच पोलिस अधिकाऱ्यास जिवे मारण्याची धमकीही दिली.
दोन स्टार लागले म्हणजे डॉन झाला का?
जीवन राजपूतने यावेळी फोनवरून पोलीस अधिकाऱ्याला प्रचंड शिवीगाळ केली. "पीएसआय आहे म्हणून माजला का? तुझ्यात दम असेल तर मला अटक कर, माझ्यात दम असून, तुला मी मारणार म्हणजे मारणारच आहे. तू टोले खाणार आहे. माझी खूप लहान केस आहे, मला तुम्ही उगाच परेशान करू नका, मला अटक करा आणि आतमध्ये टाका हे तुम्हाला आधीच सांगितले होते. मी मागे सरकत नाही. तुला दोन स्टार लागले म्हणजे तू डॉन झाला का?...मी एकटा येऊन तुला भिडतो, कुठ भिडायचं सांग...औरंगाबादमध्ये मी सहा ठिकाणी धंदे करतो. लपून-छपून धंदे मी करत नाही, असे या ऑडिओ क्लिपमध्ये जीवन राजपूत बोलताना पाहायला मिळत आहे.
गुन्हेगारांची हिम्मत वाढली
दरम्यान या सर्व प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच, त्यांनी आरोपीला बेड्या ठोकण्याचे आदेश दिले. त्यानुसार सातारा परिसरात शोध घेऊन राजपूतला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान त्याच्यावर चिकलठाणा पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हेगारांची थेट फोनवरून पोलिसांना उघड धमकी देण्याची हिम्मत कसे होते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: