धक्कादायक! दारू पिऊन पाण्याच्या टाकीवर चढणं पडले महागात, खाली पडल्याने गेला जीव
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पाण्याच्या टाकीवरून पडलेल्या सुरेश मोडे यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून दारू पिऊन पाण्याच्या टाकीवर चढलेल्या व्यक्तीचा खाली पडून जागीच मृत्यू झाला आहे. सुरेश रामकिसन मोडे ( वय 35, रा.तोंडोळी, ह.मु. वांबोरी ता.राहुरी जि.अहमदनगर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी बिडकीन येथील शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर या घटनेची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ तोंडोळी गावाचे रहिवासी असलेले सुरेश मोडे गेल्या काही दिवसांपासून कामाच्या निमित्ताने गाव सोडून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वास्तवास होते. पण गावात पुतणीच लग्न असल्याने ते गावाकडे आले होते. दरम्यान बुधवारी सुरेश हे रात्री दारू पिऊन झोपायला गेले असता उकाडा जाणवत असल्याने ते गावातील पाण्याच्या टाकीवर झोपायला गेले. पण पाण्याच्या टाकीवर गेल्यावर दारूच्या नशेत असेलल्या सुरेश यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. डोक्याला गंभीर मार लागल्याने आणि मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी उघडकीस आली घटना....
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश हे रात्री अकरा ते बारावाजेच्या दरम्यान झोपण्यासाठी पाण्याच्या टाकीवर गेले होते. याचवेळी त्यांचा झोक गेल्याने आधी ते पाण्याच्या टाकीच्या खालच्या मजल्यावर पडले. यावेळी त्यांचं डोकं सिमेटच्या कठड्यावर जोरात आदळले. त्यानंतर ते खाली पडले. रात्री घडलेली हि घटना सकाळी गावातील काही लोकांच्या लक्षात आली. त्यांनतर सुरेश यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
घरात लग्न सोहळा आणि....
तोंडळी येथे राहणाऱ्या मोडे कुटुंबात 21 तारखेला लग्न होणार आहे. तर आपल्या पुतणीचं लग्न असल्याने सुरेश हे बुधवारीच गावाकडे आले होते. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. तर आत्त्तापासूनच अनेक पाहुणे मंडळी आल्याने मोडे कुटुंबात उत्सहाचे वातावरण होते. मात्र ह्या घटनेनंतर मोडे कुटुंबावर मोठं दुःखाचे डोंगर कोसळलं आहे.