(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aditya Thackeray : अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली
Shivsena Aurangabad : शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे औरंगाबादमधील सिल्लोड या ठिकाणी 7 नोव्हेंबरला सभा घेणार होते, त्याच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.
औरंगाबाद : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिल्लोडच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र त्याच वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेला मात्र परवानगी देण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. सिल्लोड हा मतदारसंघ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा आहे.
आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे दोघेही 7 नोव्हेंबरला सिल्लोडला सभा घेणार होते. त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा परिषदेच्या मैदानात होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र त्याच वेळी आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकामध्ये होणाऱ्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.
दुसऱ्या दोन जागा सूचवल्या
आदित्य ठाकरे यांनी सभेसाठी जी जागा दिली गेली होती त्या ऐवजी दुसऱ्या दोन जागा सूचवल्या होत्या. या ठिकाणी सभा घेतल्यास त्याला परवानगी दिली जाईल, तशा प्रकारचा अर्ज करावा असं पोलिसांनी सूचवलं आहे.
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू असाही उल्लेख अब्दुल सत्तार यांनी केला होता.
काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. त्यामध्ये अब्दुल सत्तार हे जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यावरुन आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर तोफ डागत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर ठाकरे आणि सत्तार यांच्यातील वाद आणखीनच पेटलो होता.
अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे 7 नोव्हेंबर रोजी सभा घेणार आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनीही सिल्लोड शहरात सभा घेण्याचं जाहीर केलं होतं. आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेला परवानगी मिळाली पण आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर आले होते. यावेळी बीडमधील रेस्ट हाऊसमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा घेत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको म्हटले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का? असं विचारलं.