(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ; यापुढे अतिरिक्त पोलिस तैनात असणार
Aditya Thackeray: ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे.
Aditya Thackeray Security Increased: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी त्यांच्या याच 'शिव संवाद' यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून, यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार आहे. ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगावात त्यांची सभा सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घातला होता. तर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोबतच आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे. यापुढे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार असून, ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे.
अंबादास दानवेंचा पोलीस महासंचालकांना पत्र!
या सर्व घटनेनंतर अंबादास दानवे यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहले होते. ज्यात, "आदित्य ठाकरे यांचा "शिव संवाद" यात्रेचा महाराष्ट्र दौरा चालू आहे. मंगळवारी 7 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे ग्राम सचिवालय समोरील मैदानात जाहीर सभा सुरू असताना तेथे अज्ञात जमावाकडून दगड मारण्यात आला. तर सभा संपवून तेथून निघताना आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगड मारण्यात आले. तसेच सभेच्या ठिकाणी हिंसक जमाव चालून आला. सदर प्रकरणी सुरक्षेमध्ये अक्षम्य कसूर झाली आहे. याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, असे पोलिस महासंचालकांना लिहलेल्या पत्रात म्हटले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
दगडफेक झालीच नाही, पोलिसांचा दावा
दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहे. याबाबत 'एबीपी माझा'शी बोलताना औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची सभा वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे आयोजित करण्यात आली होती. सभा संपल्यावर आदित्य यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु दगडफेक करण्यात आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच सभा सुरु असताना दगड फेकण्यात आल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नसून, आदित्य ठाकरे यांची सभा सुरळीत झाली. त्यामुळे सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आल्याची कोणतेही घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
औरंगाबादच्या महालगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक