औरंगाबादच्या महालगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक
Aaditya Thackeray : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
Aaditya Thackeray Aurangabad : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचं समजतेय. महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाली. अशात बाहेर काही काळ गोंधळ बघायला मिळाला. काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आलेय. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे. यामुळे काही वेळ तिथं तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
आदित्य ठाकरे आज महालगाव, वैजापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची सभा झाली. त्यावेळी त्यांच्या गाडीवर आणि सभेच्या ठिकाणी किरकोळ दगडफेक झाल्याचं समोर आलेय. महालगाव येथे शिवसंवाद यात्रेचा मेळावा होत असताना या बाजूलाच रमाबाई यांची जयंती साजरी केली जात होती. सभा सुरु असल्याने बाजूला रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त सुरु असलेली मिरवणूक आणि डीजे थांबवण्याची विनंती पोलिसांनी भीमसैनिकांना केली. यावेळी चिडलेल्या भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने किरकोळ दगड स्टेजवर फेकले. परिसरात तणाव झाल्याचं बघता यावेळी चंद्रकांत खैरेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहताच त्यांनी स्टेजवर भाषण न करता खाली उतरून भाषण केलं. भाषणाच्या सुरवातीलाच आदित्य यांनी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही डीजे वाजवून जयंती साजरी करा, असं देखील म्हटले. भीमशक्ती-शिवशक्ती एकच आहे, तुम्हाला जर डीजे वाजवायचा असेल तर वाजवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मेळावा संपल्यानंतर जयंती साजरी करत असलेल्या लोकांनी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आदित्य ठाकरे यांची गाडी सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित बाहेर काढली. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
खैरे यांचे भाषण सुरु असताना स्टेजवर फिरकावला दगड...
आदित्य ठाकरे महालगावात पोहचल्यावर त्यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आला.यावेळी ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्यांची भाषणे झाली. मात्र यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञात व्यक्तीने स्टेजवर दगड भिरकावला. त्यामुळे यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र खैरे यांनी आपले भाषण चालूच ठेवेले. त्यानंतर सभा संपल्यावर पुन्हा एकदा आदित्य यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यापूर्वी याच गावात झाला होता राडा...
आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात ज्या महालगावात गोंधळ झाला आहे, त्याच महालगावात यापूर्वी शिंदे-ठाकरे गटात राडा झाला होता. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे एका कार्यक्रमासाठी या गावात आले असता, ठाकरे गटाने त्यांना विरोध केला होता. त्यामुळे दोन्ही गत आमने-सामने आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. त्यावेळी देखील पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली होती. आता पुन्हा त्याच गावात आदित्य ठाकरे यांच्या गावात गोंधळ पाहायला मिळाला आहे.