शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर औरंगाबाद महापालिकेत मेगा भरती; 178 पदे भरणार
Aurangabad Municipal Corporation Recruitment: अनुकंपावरील 55 आणि आस्थापनेवरील 123 अशी एकूण 178 महत्त्वाची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
![शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर औरंगाबाद महापालिकेत मेगा भरती; 178 पदे भरणार maharashtra News Aurangabad News Mega Recruitment in Aurangabad Municipal Corporation after Code of Conduct for Teacher Constituency Election 178 posts will be filled शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर औरंगाबाद महापालिकेत मेगा भरती; 178 पदे भरणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/307d840d9197e81b4b28f8b8315acb5e1674295197944443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Municipal Corporation Recruitment: गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेतील (Aurangabad Municipal Corporation) रिक्त पदांचा प्रश्न गाजत आहे. मात्र लवकरच रिक्त पद भरली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यमान प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अनुकंपावरील 55 आणि आस्थापनेवरील 123 अशी एकूण 178 महत्त्वाची पदे भरण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेसाठी शासन नियुक्त एका खाजगी एजन्सीचीही (Private Agency) नेमणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनेच महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून आवश्यकतेनुसार मे 2023 पूर्वी नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
औरंगाबाद मनपात सध्या 3 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत
औरंगाबाद महानगरपालिकेतील विविध विभागांत 3 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. तर सध्या 953 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गरज आहे. राज्य शासनाकडून मनपात प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी त्वरित मिळावेत, यासाठीही पाठपुरावा सुरु आहे. मात्र आस्थापनेवरील कर्मचारी दरमहा निवृत्त होत असल्याने हा भार आणखी वाढत आहे. सध्या मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या 5 हजार 713 एवढी झाली आहे. त्यामुळे महापालिका एक हजारापेक्षा जास्त जणांची नोकरभरती करु शकते. उपायुक्तांची सहा पदे मंजूर असून, त्यापैकी तीन पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे असून, त्यापैकी एक पद पदोन्नतीने भरण्यात येणार आहे. सहायक आयुक्तांची 50 टक्के पदे पदोन्नतीने, तर 25 टक्के पदे सरळसेवा भरतीनुसार भरण्यात येणार आहेत.
आचारसंहितेनंतरच भरती...
औरंगाबाद महानगरपालिकेत नोकरभरतीच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र सध्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरु असल्याने आचारसंहितामुळे भरती प्रकिया राबवता येत नाही. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यावरच ही मेगा भरती होणार आहे. तर 30 जूनला शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार असून, त्यानंतर या भरतीची जाहिरात निघण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची पदे भरणार!
औरंगाबाद महानगरपालिकेतील महत्त्वाचीच काही पदे सुरुवातीला भरली जाणार आहे. ज्यात वर्ग 1 ते 3 मधील निवडक पदेच भरण्याचं ठरवण्यात आल्याचे बोलले जात आहे. कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, लिपिक, अग्निशामक कर्मचारी यांसह इतर काही पदांचा यात समावेश असणार आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा बेरोजगार तरुणांना होणार असून, आता या भरतीकडे तरुणांचे लक्ष लागले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)