Aurangabad Corona Update: थंडी वाढताच कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले; औरंगाबादेत एकजण पॉझिटिव्ह
Corona Update: गेल्या अनेक दिवसांपासून शहरात एकही कोरोना रुग्ण नव्हता, मात्र आता शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळून आला आहे.
Aurangabad Corona Update: राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा पारा (Cold Mercury) घसरला असतानाच, कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. कारण औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा नवीन कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळून आला आहे. शहरातील सिडको एन-1 मधील 34 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील आणखी एका व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात एकही कोरोना रुग्ण नव्हता, मात्र आता शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळून आला आहे.
शहरात गेल्या तीन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवू लागली. त्यामुळे थंडी, ताप, सर्दी, घसादुखीचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. मनपाने सर्व आरोग्य केंद्रांत कोरोना तपासणी सुरू केली आहे. दरम्यान शनिवारी सायंकाळी सिडको एन-1 मधील तरुणाची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्याच्या संपर्कातील व्यक्तीची चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे मनपा आरोग्य विभागाने कळविले आहे.
लसीकरण ठप्प!
गेल्या काही दिवसांत कोरोनाची लाट ओसरली असल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनी कोरोना लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या तब्बल 14 हजार लसी एक्स्पायर झाल्या आहे. त्यामुळे सद्या एकही लस उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील लसीकरण ठप्प झाले आहेत. तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नवीन 75 हजार लसीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नवीन लसी आल्यावरचं आता पुन्हा लसीकरण मोहीम सुरु करता येणार आहे.
थंडी वाढली...
या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच थंडी जाणवू लागली आहे. शहराच्या किमान तापमानात एकाच दिवसात 3 अंशांची घट झाली होती. उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेचा हा परिणाम असल्याचे हवामान अभ्यासकाकडून सांगण्यात आले आहे. तर रविवारी पारा 9.4 अंशांवर पोहचला होता. त्यामुळे या थंडीचा परिणाम मानवी जीवनावर देखील होतांना पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात सर्दी, खोकला आणि तापेचे रुग्ण वाढत आहे. रुग्णालयात ठिकठिकाणी रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता कोरोना देखील डोकेवर काढतांना पाहायला मिळत आहे.
कोरोना चाचण्या वाढवल्या!
चीनसह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारतात देखील खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचण्यांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान औरंगाबाद ग्रामीण आणि शहर भागात देखील आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्या वाढवल्या जात आहे. औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत सर्वच आरोग्य केंद्रात कोरोना चाचण्या सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )