Aurangabad News: औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात चोरांचा सुळसुळाट; रुग्णांच्या नातेवाईकांसह डॉक्टर हैराण
Aurangabad Crime News: गेल्या काही दिवसांपासून घाटी रूग्णालय परिसरात चोरटे रूग्णांच्या नातेवाईकांना लक्ष करीत आहेत.
Aurangabad Crime News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालय (Aurangabad Ghati Hospital) परिसरात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांसह डॉक्टर (Doctor) देखील हैराण झाले आहेत. शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय (Government Medical College and Hospital) हे मराठवाडयातील सर्वात मोठे रूग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात मराठवाडयासह अहमदनगर, जळगाव, बुलडाणा, धुळे आदी जिल्हयातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून घाटी रूग्णालय परिसरात चोरटे रूग्णांच्या नातेवाईकांना लक्ष करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून घाटी परिसरात चोरांचा सुळसुळाट सुरु असून, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे आणि सोबत आलेल्या नातेवाईकांचे मोबाईल व रोख रक्कम लांबवित असल्याच्या दररोज घटना घडत असतात. त्याशिवाय रूग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर व वार्डातील महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचे देखील पर्स व मोबाईल चोरून नेण्याच्या घटना सतत घडत असतात. रूग्णांना भेटण्यासाठी व कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या पार्किंग मधुन दुचाकी लांबविण्याच्या घटना देखील घडत आहेत. तर रात्रीच्या वेळी नातेवाईकांसाठी असलेल्या शेड मधील गरिब नागरिकांचे ते झोपल्यानंतर त्यांच्या खिशातील रोख व मोबाईल लांबविण्यात येतात.
गोरगरिबांना बसतोय फटका...
घाटीत येणाऱ्या रूग्णांमध्ये बहुतांश रुग्ण सर्वसामान्य कुटुंबातील असतात. तर अनेक गोरगरीब उपचारासाठी औरंगाबादसह मराठवाड्यातून येत असतात. त्यामुळे त्यांच्याजवळ मोजकेच पैसे असतात. अशात चोरटे त्यांचा खिसा साफ करत आहे. त्यामुळे अनेकदा पैसे चोरीला गेल्यावर औषध आणण्यासाठी देखील रूग्णांच्या नातेवाईकांकडे पैसे उरत नाही. तर मोबाईल देखील मोठ्याप्रमाणावर चोरीला जात असल्याने याचाही मोठा फटका रूग्णांच्या नातेवाईकांना बसत आहे. तर बऱ्याचदा रूग्णांना पाहण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या दुचाकी देखील चोरीला जात आहे. त्यामुळे याचा देखील मोठा आर्थिक फटका त्यांना बसत आहे.
पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी...
घाटी परिसरात दिवसरात्र नशेखोरांचा वावर असतो. हे चोरटे असून ते नशेत गरिब लोकांना धमकावून लुटमार करतात. तसेच अनेकदा हे नशेखोर आपसात वाद घालुन भांडणे करतांना दिसतात. त्यानंतर मार खाणारा हे पोलिस चौकीत तक्रार करण्यासाठी येतात. मात्र हे प्रकार नेहमीचे असल्याने पोलिस त्यांना ठाण्यात पाठवितात. दरम्यान काही दिवसांपुर्वीच या नशेखोरीतून घाटीजवळ दोघांचा खुन करण्यात आला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून, तशी मागणी होत आहे.
Aurangabad: एक क्लिक अन् वकिलाच्या खात्यातून दीड लाख गायब; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?