Gurukunj Mozari : लाखो गुरुदेवभक्तांकडून मौन श्रद्धांजली, विदेशांतूनही आले 20 भाविक
सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आधुनिक काळातील महान संत म्हणून भारतासह विदेशात ओळख आहे.
Amravati : मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukdoji Maharaj) यांच्या 54व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त काल शुक्रवारी (14 ऑक्टोबर) अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे लाखो गुरुदेव भक्तांनी महाराजांना दोन मिनिट स्तब्ध होऊन मौन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर गुरुकुंज नगरी 'श्री गुरुदेव'च्या घोषाने दुमदुमून निघाली.
सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आधुनिक काळातील महान संत म्हणून भारतासह विदेशात ओळख आहे. ग्रामगीतेतून ग्रामविकास, राष्ट्रहित, देशाच्या सीमेवर जाऊन शत्रूला खंजिरी कीर्तनातून परिवर्तन घडवणाऱ्या या संताला दरवर्षी राष्ट्रसंतांचे महानिर्वाण मराठी पंचांगानुसार आश्विन वद्य पंचमीला (इंग्रजी पंचांगानुसार शुक्रवार 11 ऑक्टोबर 1968 साली) सायंकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी झाले होते. राष्ट्रसंतांना त्यांच्या विचारांचे सर्व धर्म पंथातील राष्ट्रसंत प्रेमी व भाविक-भक्त या दिवशी तन्मयतेने श्रीक्षेत्र गुरुकुंजात एकत्र येऊन आश्विन वद्य पंचमीला श्रद्धांजली अर्पण करतात.
दोन वर्ष कोरोना काळानंतर यावर्षी समाधी स्थळी असलेल्या मोठ्या प्रांगणात लाखो गुरुदेव भक्तांनी पांढरे शुभ्र वस्त्र, भगवी टोपी घालून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाराजांना श्रद्धांजली वाहिली. तर यावेळी अमेरिका, इंग्लंड, जॉर्जिया, जर्मनी, कॅनेडा, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशातील राष्ट्रसंत विचार प्रणालीचे अभ्यासक व परदेशी नागरिक आवर्जून उपस्थित होते. विविध देशांतून जवळपास 20 विदेशी भक्तांनी विशेष हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली.
...मज वेडची गुरुकुंजाचे
गेल्या 53 वर्षापासून अविरतपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रसंतांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने यासाठी जय्यत तयारी केली होती. 'आवडतो मज कणकण तिथला, मज वेडची गुरुकुंजाचे ।।' या राष्ट्रसंतांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन पालख्या, दिंडी-पताकांसह लाखो भाविकांनी खंजिरीच्या नादात 'श्रीगुरुदेव की जय हो!' असा जयघोष करत टाळ, मृदंगासह गजर करत सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या गुरुकुंजात सात दिवसांपासूनच डेरेदाखल झाले होते. या प्रसंगी राष्ट्रसंतांच्या भव्य दिव्य विश्व व्यापक कार्याची माहिती शब्द व सुरांच्या माध्यमातून अलोट जनसमुदायाला करुन दिल्या गेली.
सर्वधर्मियांकडून प्रार्थना
सुमारे दोन तास लाखोंचा जनसमुदाय राष्ट्रसंतांच्या विश्वात्मक विचार व कार्याचा, त्यातून भासणाऱ्या त्यांच्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसलेला होता. महाद्वारावरील विशालकाय घंटेच्या निनाद होताच ठीक 4 वाजून 58 मिनिटांनी शिस्तबद्ध रितीने गुरुदेव भक्तांनी महासमाधीस्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर 'चलाना हमें नाम गुरु का चलाना।' व 'आरती राष्ट्रसंता जगतगुरु कृपावंता।' ही आरती व सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली. तसेच हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांच्या प्रार्थना आपआपल्या धर्मगुरुंकडून येथे करण्यात आल्या. हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी काही क्षणासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वरील वाहतूक थांबवण्यात येऊन दुकानांतील व्यवहार, भोंगे स्वतःहून बंद करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र नीरव शांतता पसरली होती.
मौन श्रद्धांजलीचा नयनरम्य सोहळा
शिस्तबद्ध पद्धतीने मौन श्रद्धांजलीचा नयनरम्य सोहळा पार पडला. यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे संचालक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व प्रचारक, कार्यकर्ते, धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते. नजर जाईल तिकडे भाविकांच्या उपस्थितीचा जनसागर दिसत होता. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आध्यात्मिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले होते. यावेळी माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर, जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा, आमदार बच्चू कडू यांच्यासह, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक तथा गुरुदेव भक्तांचा लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Amravati : तुकडोजी महाराजांच्या 54व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ, महासमाधीची आकर्षक सजावट
Deekshabhoomi : 'बुद्धम शरणम् गच्छामि...'; दीक्षाभूमीला हजारो बौद्ध अनुयायांचे नमन