Deekshabhoomi : 'बुद्धम शरणम् गच्छामि...'; दीक्षाभूमीला हजारो बौद्ध अनुयायांचे नमन
आंबेडकरी अनुयायांकडून 14 ऑक्टोबर, या दिनालाही महत्त्व दिले जाते. याच दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर पोहोचून डॉ. बाबासाहेब आणि तथागत बुद्धांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित झाले.
Nagpur News : अशोक विजयादशमीदिनी बाबासाहेबांनी धम्मक्रांती (Dhammachakra Pravartan Diwas) केली होती, त्यामुळे परंपरेनुसार दसऱ्याला हा दिवस साजरा केला जातो. मात्र, तारखेचेही महत्त्व असल्याने आंबेडकरी अनुयायांकडून 14 ऑक्टोबर, या दिनालाही महत्त्व दिले जाते. याच दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर पोहचून डॉ. बाबासाहेब व तथागत बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रित झाले. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो बांधवांना तथागत बुद्धाच्या धम्माशी जोडून अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणले होते.
विशेषतः 14 ऑक्टोबरला शहरातील अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीला नेहमीप्रमाणे सहकुटुंब पोहोचले. यावेळी अनुयायांनी बाबासाहेब व तथागतांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. कुणी कुटुंबासह पोहोचले तर विविध सामाजिक संघटना व विविध वस्त्यातील नागरिक पायदळी रॅली काढून प्रेरणाभूमीवर पोहोचले. बुद्धम शरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि..., भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयषोशाने संपूर्ण दीक्षाभूमी परिसर दुमदुमला.
शहरातील हजारो अनुयायी कुटुंबासह भोजनाचे साहित्य घेऊन दीक्षाभूमीवर पोहोचले. नागरिकांनी परिसरातील हिरवळीवर सहकुटुंब भोजनाचा आस्वाद घेतला. बुद्द विहारांचे सदस्य, महिला मंडळाच्या सदस्यांचा समावेश यामध्ये मोठ्याप्रमाणावर होता. बहुतेक उपासक शुभ्र वस्त्र परिधान करुन अभिवादनासाठी पोहोचले. याअंतर्गत दीक्षाभूमी परिसरात पुस्तकांचे, गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे स्टॉल सजले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता सैनिक दलाच्यावतीने शुक्रवारी सकाळी मार्च काढून मानवंदनाही देण्यात आली.
विदर्भातील अनुयायांनी गाठले नागपूर
दसऱ्याला जगभरातून अनुयायी दीक्षाभूमीवर पोहोचतात. यावेळी एक दिवसाआधीपासूनच शहरात अनुयायी जमण्यास सुरुवात होते. त्याप्रकारेच नागपूर शहर, ग्रामीण यांच्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यातूनही भाविक पावन दीक्षाभूमीला नमन करण्यासाठी पोहोचले. अनेकांनी सहकुटुंब आपल्या चिमकुल्यांसह दीक्षाभूमी गाठली.
इतर महत्त्वाच्या बातम्या