(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'तुमच्या तक्रारी लेखी स्वरूपात द्या, तोपर्यंत मी काहीच करू शकणार नाही' : अब्दुल सत्तार
Abdul Sattar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार विदर्भ दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी अमरावती जिल्ह्याचा देखील आढावा घेतला.
Amravati News : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) हे मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. शुक्रवारी अब्दुल सत्तार यांनी धामणगाव रेल्वे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. मात्र आपली व्यथा सांगणाऱ्या शेतकऱ्यांचा अब्दुल सत्तारांनी, "जोपर्यंत माझ्याकडे लेखी तक्रार किंवा निवेदन देणार नाही तोपर्यंत मी काहीच करू शकणार नाही" अशा शब्दात हिरमोड केला.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे गुरुवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. वर्धा येथील पाहणी दौरा आटोपून सत्तार अमरावती जिल्ह्यात दाखल होतील अशा सूचना शेतकऱ्यांना मिळाल्या होत्या. त्याप्रमाणे शेतकरी सकाळपासून आपल्या बांधावर हजर होते. मात्र आपला पूर्व नियोजित दौरा बदलून कृषीमंत्री वर्ध्याहून थेट यवतमाळ मध्ये पोचले. तेथील पाहणी आटोपून संध्याकाळी 7 च्या सुमारास अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात दाखल झाले. तोपर्यंत शेतकरी मात्र ताटकळत उभे होते. खुद्द कृषीमंत्री आपली व्यथा ऐकायसाठी येत असल्याचे समजल्यावर शेतकरी हातातील कामं टाकून त्यांची वाट बघत उभे होते. मंत्री महोदय शेताची पाहणी करण्यासाठी आले खरे मात्र, आपली व्यथा सांगणाऱ्या शेतकऱ्यांनी लिखित स्वरूपात आपल्या तक्रारी द्याव्या अन्यथा मी काहीच करू शकत नाही असे फर्मानच कृषी मंत्र्यांनी सोडले. दिवसभर मंत्री महोदयांची वाट बघणारे शेतकरी यामुळे हिरमूसले. लेखी निवेदन त्यांनी आणले नव्हते अन मंत्री महोदय तोंडी तक्रारी ऐकून घ्यायला तयार नव्हते, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. पाहणी दौऱ्यात कृषीमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून मिळेल तेव्हडी माहिती घेतली. काही शेतकऱ्यांशी थोडीफार चर्चा केली आणि झालं 15 ते 20 मिनिटात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पाहणी दौरा आटोपला.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे हे सर्वश्रुत आहे. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी पंचनामे करून प्रशासनाला माहिती देत आहेत. विरोधकही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहेत तर सरकारही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत आहे. मग असं सगळं असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तरांना शेतकऱ्यांकडून लेखी स्वरूपातच तक्रारी कशाला हव्या आहेत? हे मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेलं एक कोडंच म्हणावं लागेल.
हे देखील वाचा-