Dahi Handi 2022 : देवेंद्र फडणवीस आले आणि इशाऱ्याने वजनकाटा दूर करण्यास सांगितला, अमरावतीत रक्ततुला करण्यास नकार
Devendra Fadanvis : अमरावतीतील दहीहंडीच्या कार्यक्रमात राणा दाम्पत्यांनी देवेंद्र फडणवीसांची रक्ततुला करण्याचे आयोजन केलं होतं.
अमरावती : राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात रक्ततुला करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. राणा दाम्पत्यांनी अमरावतीमध्ये आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला होणार होती. यासाठी तीन हजार लोकांनी रक्तदान केली असल्याची माहिती होती. या रक्ततुलास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच देवेंद्र फडणवीसांनी हाताच्या इशाऱ्याने वजनकाटा हटवण्यास सांगितला. त्यानंतर तो वजनकाटा हटवण्यात आला आणि त्यांची रक्ततुला रद्द करण्यात आली. यावर बोलताना अमरावतीच्या खासदार रवी राणा म्हणाल्या की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याला नकार दिला नाही तर प्रोटोकॉलमध्ये त्यांचे रक्त आणि त्यांचे वजन आपण एकत्रित ठेऊ शकत नाही. त्यांचे जेवढे वजन आहे त्या पेक्षा दुप्पट रक्तदान करण्यात आलं आहे. हे रक्त आरोग्य विभागाला देण्यात आलं आहे. यावेळी जवळपास तीन हजार लोकांनी रक्तदान केलं आणि त्याच माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केलं."
नेमकं काय झालं?
अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेता गोविंदा उपस्थित होते. त्यानंतर व्यासपीठावरुन देवेंद्र फडणवीस खाली उतरले. त्यावेळी त्यांची रक्ततुला करण्यात येणार होती. फडणवीसांनी हाताच्या इशाऱ्यानेच तो वजनकाटा बाजूला काढण्यास सांगितला. नंतर त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिरातील गोळा झालेलं रक्त हे आरोग्य विभागाला देण्यात आलं.
अमरावतीमध्ये आज दही हंडी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस हे आज अमरावतीमध्ये बोलत असताना म्हणाले की, "आता आपलं सरकार आलं आहे, सगळं कसं खुलं खुलं वाटतंय. दोन वर्षे सगळं बंदिस्त होतं. आता यापुढे गणेशोत्सव, दिवाळी सर्व सण उत्साहात साजरे होणार. हे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल जेलमध्ये टाकणार नाही. हे सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचं सत्कार करणारं आहे."
रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पाहिलेल्या विकासाचं स्वप्न आता साकार होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. रवी राणा आणि नवनीत राणा हे गरीबांचे कैवारी आहेत, म्हणूनच तुम्ही सगळे त्यांच्या मागे उभे आहात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.