Amravati News : मेळघाटातील दुनी इथल्या महिलेने दिला चार मुलींना जन्म, बाळ आणि आई सुखरुप
Amravati News : अमरावती जिल्ह्यातील दुनी इथे महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला. चारही बाळं आणि माता सुखरुप आहे.
Amravati News : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील दुनी इथे महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला. चारही बाळं आणि माता सुखरुप आहे. चारही बाळ मुली आहेत. बाळांचे वजन कमी असल्याने सध्या त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं आहे.
सोनोग्राफी न केल्याने डॉक्टरही संभ्रमात
दुनी इथे राहणाऱ्या पपिता बळवंत उईके (वय 24 वर्षे) या महिलेला काल (12 जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. या महिलेबद्दल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना अधिक माहिती नव्हती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिच्या गर्भाशयात एकापेक्षा जास्त बाळं असू शकतात अशी शंका डॉक्टरांना आली. महत्त्वाचं म्हणजे महिलेने सोनोग्राफीच केली नव्हती. त्यामुळे डॉक्टरही संभ्रमात होते.
चारही बाळं डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये
पहिल्या बाळ जन्मानंतर एकापाठोपाठ एक तीन बालकांची प्रसुती झाली. ही बातमी रुग्णालयात पसरल्यानंतर उत्सुकता निर्माण झाली. चारही बाळ मुली असून त्या सुखरुप आहे. शिवाय आईची तब्येतही चांगली आहे. या चारही बालकांचं वजन 1 किलो 300 पेक्षा कमी असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीती शेंद्र, परिचारिका तेजस्वी गोरे, नंदा शिरसाट यांच्या टीमने महिलेची सुखरुप आणि सुरक्षित प्रसुती केली. ही प्रसूती सोपी नसली तरी डॉक्टरांच्या मेहनतीमुळे आई आणि चारही बालकं सुखरुप असल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
झारखंडमधील महिलेचा एकाच वेळी पाच बाळांना जन्म
दोन महिन्यांपूर्वी झारखंडमधील एका महिलेने एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिला होता. झारखंडच्या रांचीमधील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) या हॉस्पिटलमध्ये 22 मे रोजी दुपारी अंकिता कुमारी नावाच्या महिलेची प्रसुती झाली होती. 22 मेच्या दुपारी अंकिता कुमारी यांना अचानक प्रसवकळा सुरु झाल्या आणि अर्धा तासाच्या आत त्यांनी एकेक करुन पाच मुलींना जन्म दिला. रिम्समध्ये पाच बाळांचा एकाचवेळी जन्म होण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी एका महिलेने एकावेळी चार मुलांना जन्म दिला होता, पण तो विक्रम मोडित निघाला आहे.
सर्वाधिक बाळांना जन्म देण्याचा रेकॉर्ड मोराक्कोच्या महिलेच्या नावावर
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार एकाचवेळी सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा रेकॉर्ड मोरक्कोच्या हलीमा सिसे यांच्या नावावर आहे. त्यांनी 2021 साली एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला. यात 5 मुली आणि 4 मुलं होती.
हेही वाचा