Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
Pravin Janjal : अकोला येथील मोरगाव भाकरे गावातील भारतीय सैन्य दलातील जवान प्रवीण जंजाळ यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं.
अकोला : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले . तर अन्य चार जण लपून बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ या जवानाचा समावेश आहे. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली आहे.
जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु असताना सैन्य दलाची दहशतावाद्यांशी चकमक झाली. यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.तर, दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. अजून चार दहशतवादी लपून बसल्याची शंका सुरक्षा दलांना आहे. या घटनेत अकोल्यातील एक जवान शहीद झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हे जवान शहीद झाले आहेत. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोचताच गावात शोककुल वातावरण पसरलं आहे.
2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालं आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.
Contact established at Frisal Chinnigam area in #Kulgam district. Police and security forces are on job. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 6, 2024
सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. जिथं चकमक झाली तेथील ड्रोन फुटेजनुसार चार मृतदेह आढळन आले. गोळीबार सुरु असल्यानं ते मृतदेह ताब्यात घेण्यात आले नव्हते. चकमक सुरु असून काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक वी.के. बिरधी यांनी नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु राहील, असं म्हटलं.
सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत. मात्र, चकमक अजून संपलेली नाही. बिरधी यांनी म्हटलं की जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ चकमक झालेली नसून अंतर्गत भागात झालेली आहे.
इतर बातम्या :
Ravindra Waikar: मोठी बातमी! रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे