Maharashtra Politics Shivsena: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची विनंती कोणी केली? संदिपान भुमरेंचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics Shivsena: सध्या शिवसेनेत असलेल्या आमदाराने एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना हटवून मुख्यमंत्रीपदी राहण्याची गळ घातली होती असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार व राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांनी केला.
Maharashtra Politics Shivsena: शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या निष्ठा यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने हिंदू गर्व गर्जना (Hindu Garva Garjana Melawa) मेळावा सुरू केला आहे. या मेळाव्यातून शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. अकोल्यात झालेल्या मेळाव्यात राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (Sandipaan Bhumare) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे गटातून शिवसेनेत परतलेले आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होण्याची गळ घातली होती असा गौप्यस्फोट भुमरे यांनी केला.
आज अकोल्यात शिंदे गटाचा 'हिंदू गर्वगर्जना मेळावा' झाला. या मेळाव्यात मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकरांनी आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी भाषणात बोलताना संदिपान भुमरे यांनी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. नितीन देशमुख हे शिंदे गटातून शिवसेनेत परतले होते.
संदिपान भुमरे काय म्हणाले?
ठाण्यावरून सुरतकडे जात असताना कारमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख यांच्यासह मी स्वत: होतो, असे संदिपान भुमरे यांनी म्हटले. त्यावेळी नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याची गळ घातली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खेचत तुम्ही स्वत: मुख्यमंत्री व्हा, असे देशमुखांनी एकनाथ शिंदेंना म्हटले असल्याचे भुमरे यांनी म्हटले.
लाजेखातर खोटं बोलावं लागत होतं- भुमरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर संदिपान भुमरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे हे आमदारांना सोडा, कॅबिनेट मंत्र्यांनादेखील भेटत नव्हते. लाजेखातंर पक्षप्रमुख आम्हाला भेटतात असं खोटं बोलावं लागत होतं, असेही भुमरे यांनी म्हटले. युतीच्या नावावर मते घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणारे तुम्हीच गद्दार असल्याचा घणाघातही भुमरे यांनी केला. युती तुम्ही तोडली. मात्र, जनता आम्हाला जाब विचारत होती असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्राचा कारभार अडीच वर्ष ऑनलाईनच झाला असल्याची टीका भुमरे यांनी केली.
अर्जुन खोतकर म्हणतात, मुख्यमंत्री भुमरे...
शिवसेनेतून शिंदे गटात सामिल झालेले अर्जुन खोतकर यांनी बोलण्याच्या ओघात संदिपान भुमेर यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला. खोतकरांनी भुमरेंचा उल्लेख 'मुख्यमंत्री' केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्यात. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती. मात्र, 'मातोश्री'वरील काही लोकांनी सात दिवस दिवस हा निरोपच उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू दिला नाही, असा दावा खोतकरांनी केला.