(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अकोल्यात दोघा बहिणींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या भीमकुंड नदीत काल सायंकाळच्या सुमारास या दोन्ही मुलींना नदीत टाकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे.
अकोला: अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील भीमकुंड नदीत दोघा बहीणींना अज्ञातांनी फेकून दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. या दोघी बहिणी काल दुपारपासून घरी न आल्याने त्या हरविल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी काल दाखल केली होती. परंतू या बहिणींना नदीच्या पात्रात फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पाणबु्ड्यांच्या मदतीने नदीच्या पात्रात शोध सुरु केला आहे. रात्रीची वेळ असल्याने शोधकामात अडथळे येत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा गावातल्या दोन अल्पवयीन मुलींना अकोल्यात भिकुंड नदीत फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मुलीच्या नातेवाईकांनीच हे कृत्य केल्याचा संशय देखील बुलढाणा पोलिसांना आहे. दरम्यान, काल दुपारपासून या दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता आहेत. या अल्पवयीन बहिणी बेपत्ता असल्याची तक्रार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात दाखल आहे. कालपासून बुलढाणा पोलिसांकडून या दोन्ही मुलींचा शोध सुरु आहे. याच दरम्यान पोलिसांना काही माहिती हाती लागली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय आता पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.
भीमकुंड नदीपात्र आणि परिसरात शोधमोहीम
दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या भीमकुंड नदीत काल सायंकाळच्या सुमारास या दोन्ही मुलींना नदीत टाकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे अकोल्यातील बाळापूर आणि बुलढाणा पोलिसांकडून नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे. शोध व बचाव पथकामार्फत ही शोध मोहीम सुरू आहे. नातेवाईकांनीच मुलींना नदीत टाकून देण्याचा संशय पोलिसांना आहे. त्या आधारावरच आता पोलिसांची भीमकुंड नदीपात्र आणि परिसरात बचाव पथकाच्या मार्फत शोधमोहीम सुरु केली. आलिया आणि सदफ असं या बेपत्ता मुलींची नाव असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुली परतल्याच नाही
दरम्यान काल बुलढाण्यातील कदमापूर येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोघी बहिणी घरून निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला, मुली घरी परतल्या नाही, अखेर कुटुंबियांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत दाखल केली होती.
हे ही वाचा :
Ramraje Naik Nimbalkar : तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाहीच, पण रामराजे निंबाळकरांनी भाजपबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला, म्हणाले....