भाजपच्या माजी नगरसेवकाच्या हत्याकांडातील सहा आरोपींना जन्मठेप, अकोला जिल्हा न्यायालयाचा निकाल
Akola Crime : या हत्याकांडात दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील भाजपचे माजी नगरसेवक मनोज शर्मा यांच्या बहुचर्चित हत्याकांडाचा आज निकाल लागला. यात सहा आरोपींना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दोन जणांची यात निर्दोष सुटका करण्यात आली. यातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. आज शिक्षा सुनावलेल्या आरोपींना न्यायालयाने 1.50 लाखांचा दंड सुनावला आहे. 4 जून 2014 रोजी मूर्तिजापुरातील अग्रसेन चौकात 8 जणांनी अंतर्गत वादातून मनोज शर्माची धारदार शस्त्रांनी हत्या केली होती.
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार माजी नगरसेवक राम जोशींची साक्ष या खटल्यात महत्वपूर्ण ठरली. हा निकाल अकोला जिल्हा न्यायालयात न्यायाधीश सुनिल पाटील यांनी दिला आहे. तर सरकारतर्फे सरकारी वकील राजेश देशपांडे यांनी बाजू मांडली आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयात सुनावणी दरम्यान मूर्तिजापूर शहरचे विद्यमान ठाणेदार सचिन यादव यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.
काय होतंय नेमकं प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये अग्रसेन चौकात 4 जून 2014 रोजी आठ जणांनी मिळून माजी नगरसेवक मनोज शर्मा यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. यावेळी मध्यस्थीसाठी गेलेले राम जोशी हे देखील या घटनेत जखमी झाले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या मनोज बन्सीलाल शर्मा याला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी राम मोहनलाल जोशी यांच्या तक्रारीवरून आठ आरोपीविरुद्ध भादंवि कलम 302, 307, 201, 212, 147, 148, 149 आणि शस्त्रास्त कायद्यातील कलम 4, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अकोल्यात त्यावेळी परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रवीण मुंढे. पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे आणि गजानन पडघान यांनी या घटनेचा तपास केला होता. दरम्यान तू माझ्याकडे का बघत आहे? असं एकमेकांना विचारण्याच्या कारणावरून हे हत्याकांड घडलं असल्याचं पोलीस सांगतात.
मुर्तिजापूरातील तत्कालीन भाजप नगरसेवक प्रवीण बन्सीलाल शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बबन वामनराव शितोळे, गणेश वसंतराव शितोळे, नामदेव बबन शितोळे, कपिल रतन शितोळे, प्रमोद शेषराव चव्हाण, पंकज निळकंठ डोंगरदिवे, मो. रिजवान शेख इकबाल आणि विजय अनंत लोकरे यांना अटक केली होती. या घटनेचा पूर्ण तपास झाल्यानंतर अकोला न्यायालयात खटला सुरू झाला. अखेर प्रकरणातील सर्व साक्षीदारांचे बयान म्हणून तसेच पुराव्याच्या आधारावर आज अकोला जिल्हा न्यायालयाने यातील सहा आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर दोघांची सुटका दिली आहे. मो. रिजवान शेख इकबाल आणि विजय अनंत लोकरे असे सुटका झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
अशी झाली सहा आरोपींना शिक्षा
या सहा आरोपींना भादवि कलम 148 नुसार प्रत्येकी दोन वर्षे सक्त मजूरीची शिक्षा व प्रत्येकी रुपये 5 हजार रुपयांची दंडाची तसेच दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. कलम 307 सह कलम 149 नुसार जन्मठेपेची तसेच प्रत्येकी रुपये दहा हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास 3 महिने फक्त मजुरीचे शिक्षा सुनविण्यात आली. खुनासह कलम 149 नुसार जन्मठेपेची तसेच प्रत्येकी रुपये दहा हजार रुपये दंडाची तसेच दंड रक्कम न भरल्यास तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनवाली आहे. दरम्यान फरार आरोपी आशिष बबन शितोळे व गोलू उर्फ आकाश अनिल गांजरे हे फरार आरोपी सापडल्यानंतर तपासी अंमलदाराने त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे आरोप पत्र दाखल करावे. तोपर्यंत सदर गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल व खटल्यातील सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवण्यात यावीत.
फरार आरोपींपासून अजूनही धोका कायम
न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आम्ही पुर्ण समाधानी आहोत, परंतु उर्वरित फरार आरोपींना पोलिसांनी शोधून गजाआड करावे. फरार आरोपी मोकाट असल्याने आमच्या जिवीतास कायम धोका असल्याचे फिर्यादी राम मोहनलाल जोशी 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणाले. आशिष बबन शितोळे व गोलू उर्फ आकाश अनिल गांजरे असे या फरार आरोपींची नावे आहे.