MLA Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुख अन् समर्थकांकडून ड्युटीवरील पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ; गुन्हा दाखल
सत्तांतरादरम्यान शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेले होते. शिंदे गटाने मला जबरदस्ती घेऊन गेल्याचा दावा करत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे परत आल्यानंतर राज्यभरात चर्चेत आले होते.
Nagpur News : गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडे परत आल्यानंतर चर्चेत आलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रवी भवन येथे पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार मंगळवारी (27 डिसेंबर) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आमदार नितीन देशमुख आपल्या काही सहकाऱ्यांसोबत रवी भवन येथे पांढऱ्या रंगाच्या गाडीने आले. यावेळी ड्युटीवर असलेले सुरक्षारक्षक येणाऱ्या प्रत्येकाची पास तसेच साहित्याची तपासणी करत होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना पास तपासणीसाठी थांबवले असताना आमदारांनी आपला बिल्ला दाखवून हे काय आहे माहिती आहे का? असे खडसावले तसेच देशमुख यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
पोलीस अधिकारी कांबळे यांनी पोलीस तक्रारीत दिलेला लेखी जबाब खालीलप्रमाणे...
- आमदार नितीन देशमुख: (पीआय कदम यांना) तुम्ही लोकांना का अडवता?
- पीआय कदम : साहेब सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक व्यक्तीला पास देऊन आतमध्ये प्रवेश देतो.
- आमदार नितीन देशमुख : (शर्टवर लावलेला बिल्ला दाखवत) तुम्हाला हा बिल्ला कशाचा आहे हे माहित आहे का? तुम्ही मला ओळखता का?
- देशमुखांचा समर्थक : ए! पीआय तू कुणाशी बोलतोय तुला माहित आहे का?
- पोलीस अधिकारी कांबळे : ते पोलीस निरीक्षक आहेत. ते आपले शासकीय कर्तव्य पार पाडत आहेत. अर्वाच्य भाषा वापरु नका.
- देशमुखांचा समर्थक आणि इतर लोक : हरामखोरांनो!, तुमची काय लायकी आहे हे मला माहित आहे. चांगल्या ठिकाणी बदली करण्यासाठी तुम्ही पोलीसवाले आमच्या आमदारांच्या पाया पडता (यावेळी मोठा गोंधळ उडाला रेटारेटीत समर्थक पोलिसांना बाजूला सारत रवीभवनच्या दिशेने निघाले. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली.)
- प्रवेश केल्यावर आमदार नितीन देशमुख : (पोलीस अधिकारी कांबळे यांना) मी बाळापूर विधानसभा क्षेत्राचा आमदार नितीन देशमुख आहे. तुला आणि तुझ्या पीआयला उद्या पाहून घेतो. त्यानंतर आमदार देशमुख यांनी आपल्याला धक्का दिलाचा आरोप पोलीस अधिकारी कांबळे यांनी केला आहे.
सत्तांतरानंतर चर्चेत
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे सत्तांतर होत असताना शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटीला गेले होते. यावेळी आमदारांनी मला जबरदस्ती घेऊन गेल्याचा दावा करत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे परत आल्यानंतर राज्यभरात चर्चेचा विषय होते.
ही बातमी देखील वाचा...