Akola News : टरबूज पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला; अकोल्यातील बळीराजा आर्थिक संकटात
Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातला टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाये. पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिक अक्षरक्ष: वाळून गेलंय.

Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातला टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाये. यंदा टरबूज आणि खरबूज पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिक अक्षरक्ष: वाळून गेलंय. त्यामूळे शेतकऱ्यांचं या हंगामातील टरबूज पिक हातातून निघून गेलंय. काही शेतात टरबूज पिवळं पडल्याने चक्क पपईसारखं दिसू लागलंय. टरबूज पिक पिवळं पडल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेय. परिणामी टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
प्रति हेक्टरी 1 लाख रुपये लागत, लागवड खर्च निघणंही अवघड
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दानापूर, हिंगणी, हिवरखेड, तळेगाव, झरी, सौंदळा, वारखेड आणि कारला गावासह अनेक भागात टरबूज पिकावर अज्ञात रोगाचा मोठा प्रादुर्भाव झालाय. यात शेकडो शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय. यासाठी शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रति हेक्टरी 1 लाख रुपये खर्च आलाय. परंतू, आता खर्च निघणंही शेतकर्यांसमोर कठीण झालंये. त्यामुळे सरकारनं तातडीने नुकसानाचे पंचनामे करून टरबूज पिकाला विमा कवच द्यावे, अशी मागणी तळेगाव येथील युवा शेतकरी तुषार कोरडे या शेतकऱ्याने केलीये.
अद्याप कोणीही डोकावूनसुद्धा पाहलं नाही, शेतकऱ्यांचा आक्रोश
तेल्हारा तालुक्यात शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जातेय. या टरबुजाच्या लागवडीतूनही शेतकऱ्यांना मोठा नफा मिळतो. पण, यंदा टरबूज पिकावर अज्ञात रोग आला अन् चक्क हिरवे दिसणारे टरबूज काही दिवसातच पूर्णतः पिवळे पडले. यासाठी शेतकऱ्यांनी किडनाशकांच्या फवारण्या, तसेच खत नियोजन केल खरं, परंतु त्याचा काहीही फायदा होतांना दिसत नाहीये. कृषी विभागाला तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणीही डोकावूनसुद्धा पाहलं नाही. अखेर वैतागून शेतकऱ्यांनी हतबल होत शेतातलं टरबूज जनावरांसमोर खायला टाकलंये. तर काही शेतकऱ्यांनी टरबूज पिक जमिनीतून उखडून रस्त्यावर फेकलेय.
टॉमेटोचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा. मात्र, पारंपरिक भातपिक उत्पादक शेतकरी (Farmers) आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडं वळलेत. मात्र, सध्या हे बागायती शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. बागायती शेतीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यानं त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत.
एक कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजारात विक्रीपर्यंत सुमारे 90 रुपयांचा खर्च शेतकऱ्याला येतो. या एक कॅरेट टोमॅटोला केवळ 25 रुपयेपर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना 65 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतो, त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही तशाच प्रकारे हमीभाव दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावेल, अशी अपेक्षा आता शेतकरी बाळगत आहेत.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
