![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'15 दिवसांत आमचा नवीन खासदार होणार, अजितदादांचे वक्फ बोर्ड कायद्याबाबत अल्पसंख्यांकांसमोरच मोठं वक्तव्य
Ajit Pawar : दोन जागांसाठी तीन सप्टेंबरला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यापैकी एक जागा भाजप आणि एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला येणार, असे बोलले जात आहे.
!['15 दिवसांत आमचा नवीन खासदार होणार, अजितदादांचे वक्फ बोर्ड कायद्याबाबत अल्पसंख्यांकांसमोरच मोठं वक्तव्य Ajit pawar big statement about Waqf Board in front of minorities Our new MP will be in 15 days Malegaon Maharashtra Marathi News '15 दिवसांत आमचा नवीन खासदार होणार, अजितदादांचे वक्फ बोर्ड कायद्याबाबत अल्पसंख्यांकांसमोरच मोठं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/12/96bf2e1779c234a83bc6f06726e55f761723445883568923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मालेगाव : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे 3 सप्टेंबरला राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. दोन जागांपैकी एक जागा भाजप (BJP) आणि एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Group) वाट्याला येणार, असे बोलले जात आहे. आता यावरून 15 दिवसांत आमचा नवीन खासदार होणार असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वक्फ बोर्डाबाबत (Waqf Board)महत्त्वाचे भाष्य केले आहे.
संसदेत अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ बोर्ड कायद्यात संशोधन विधेयक लोकसभेत मांडले. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात चर्चेसाठी येणार आहे. मात्र, आत्तापासूनच विरोधी पक्ष याविरोधात आक्रमक झाले आहेत. एनडीएतील घटक पक्ष जेडीयू आणि टीडीपीने या विधेयकासंदर्भातील निर्णयास हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र सरकारने उचललेले पाऊल धर्मात अशांतता निर्माण करेल, असे काही मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले असताना अजित पवारांनी अल्पसंख्याक समाजाला मोठे आश्वासन दिले आहे.
वक्फ बोर्डाबाबत कोणतीही अडचण येऊ देणार नाही
अजित पवार म्हणाले की, तुम्ही आमच्या मागे उभे राहा, कारण आम्ही महायुती म्हणून 1 लाख रुपये देत आहोत. शिक्षणासाठी मुलींना आम्ही रक्कम देत आहोत. 50 टक्के पैसे शिक्षणासाठी आम्ही देत होतो. मात्र, आम्हाला लक्षात आलं की, केवळ अर्धे पैसे देऊन चालणार नाही. म्हणून आम्ही 100 टक्के रक्कम देण्याचा निर्धार केला आहे. 15 दिवसांत आमचा नवीन खासदार होणार आहे. आम्ही अल्पसंख्याक समाजाचे विषय घेऊन केंद्रात जाऊ. आम्ही वक्फ बोर्डाविषयात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. आम्ही कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आमचा कायम पाठिंबा अल्पसंख्याक समाजाला असेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
अजित पवार यांनी घेतली आसिफ शेख यांची भेट
दरम्यान, जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिकच्या मालेगावात दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेतली. माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर ही सांत्वनपर भेट असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. मात्र, माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत दुजोरा दिला. काँग्रेससह अनेकांनी मला पक्षात येण्यासंदर्भात ऑफर दिल्या आहेत. मात्र मी मालेगाव मध्य मधून अपक्ष निवडणूक लढविणार या मतावर ठाम आहे, असे आसिफ शेख यांनी सांगितले. तर अजित पवार यांच्याकडून आसिफ शेख यांना गळाला लावण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा मालेगावात रंगली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)