'इतक्या खालच्या पातळीवर द्वेष करणं राजकारण्यांना शोभत नाही', विखे पाटलांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group) प्रवक्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे. आता यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे.
एकनाथ शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नहीं, असा नाराच सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीत दिल्याचे समजते. आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्र्यांवर आपण टीका करायची नाही. सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र यांच्यावर टीका करायची, असे सुप्रिया सुळे म्हणाल्याची माहिती आहे. यावरून राधाकृष्ण विखेंनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.
इतक्या खालच्या पातळीवर द्वेष करणं राजकारण्यांना शोभत नाही
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मविआला लोकसभा निवडणुकीत अपघाताने यश मिळालेले आहे. त्यामुळे हा मस्तवालपणा योग्य नाही. इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारणातील द्वेष करणे हे राजकारण्यांना शोभत नाही. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेली प्रगती पाहून यांना पोटसुळ उठलं आहे. राज्यात पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री पुन्हा होणार, असे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याचे आदेश प्रवक्त्यांना दिले का? असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केवळ फडणवीसांना टार्गेट करा, असं मी कुठे म्हणाले? मी कुठे बोलले याचा तुमच्याकडे पुरावा आहे का? तुमच्याकडे व्हिडीओ आहे का, मला तो दाखवा, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
...म्हणून फडणवीसांवर राग काढताय : राधाकृष्ण विखे
दरम्यान, महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केलेले कामं हे मागील पन्नास वर्षात देखील झाले नाही. त्यामुळे अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्यांना शल्य आहे की, आम्ही विकास करू शकलो नाही. त्यांचा खरा चेहरा समोर आल्यानं फडणवीस यांच्यावर राग काढत आहेत. आपला नाकर्तेपणा उघड झाल्याने फडणवीस यांच्यावर टीका केली जात असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.
विखे पाटलांचा अजित पवारांना सल्ला
2019 च्या निवडणुकीत आम्ही 56 जागा जिंकलो होतो. तसेच सहा ते सात अपक्ष आमदार आमच्याबरोबर होते. त्यामुळे आम्ही 60 जागा लढण्यास इच्छुक आहोत. पण यापेक्षा नक्कीच अधिक जागा आणि त्याही मेरीटवर मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. तसेच महायुतीत कुणीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही, असे भाष्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीत केले होते. याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे म्हणाले की, जागा वाटपात प्रत्येकाची इच्छा असते. महायुतीत ठरल्याप्रमाणे जागावाटप निश्चित होईल. मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतर ठरेल, हे धोरण यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा होणारी ही वक्तव्य टाळावी, असा सल्ला विखे यांनी अजित पवारांना दिला.