Shirdi: शिर्डीत वातानुकूलित दर्शन कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्यात, भाविकांचा वेळ वाचणार
Shirdi : देशातील दुसरे तर राज्यातील सर्वधिक श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिर्डीत दर्शनासाठी दररोज हजारो तर उत्सव व सुट्टीच्या काळात लाखो भाविक हजेरी लावतात.
शिर्डी : साईबाबा (Saibaba) संस्थानचा महत्वाकांक्षी असलेल्या दुमजली दर्शनरांग कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्यात आले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भक्तांची आता सुटका होणार आहे. 109 कोटी रूपये खर्चून बांधलेले अत्याधुनिक दर्शनरांग कॉम्प्लेक्स लवकरच सुरू होणार असून पूर्ण वातानुकूलित असलेल्या या रांगेत भक्तांना लॉकरसह सर्वच सुविधा एका छताखाली मिळणार आहेत..
देशातील दुसरे तर राज्यातील सर्वधिक श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिर्डीत (Shirdi) दर्शनासाठी दररोज हजारो तर उत्सव व सुट्टीच्या काळात लाखो भाविक हजेरी लावतात. अनेकदा गर्दीमुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी तासनतास दर्शनरांगेत सुद्धा उभं राहण्याची वेळ भक्तांवर येत असते. मात्र आता नव्याने बांधण्यात आलेल्या दुमजली दर्शन रांगेमुळे साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. अत्याधुनिक दर्शनरांग ही संपूर्ण वातानुकूलीत असून साईभक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी यामध्ये घेण्यात आली आहे.
शिर्डीत भक्तांना लॉकर, चप्पल स्टॅण्ड ,लाडू काऊंटर, डोनेशन काऊंटर, ऊदी स्टॉल, टॉयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. आता नवीन दर्शन रांगेमुळे सगळ्या सुविधा एकाच छताखाली येणार असून इमारत बांधताना भक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. ही इमारत भूकंपरोधक असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. साईबाबा संस्थानचा हा महत्वकांशी प्रकल्प असून तिरूपती बालाजीच्या धर्तीवर त्यांच्यापेक्षाही सुसज्ज अशी ही दर्शनव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन दर्शनरांग कॉम्प्लेक्स, शैक्षणिक संकुल लोकार्पण करण्याचे निमंत्रण दिले आहे. साधारण मार्च महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं आहे.
कसा आहे कॉम्प्लेक्स?
- 109 कोटी रुपये खर्चाची अद्ययावत व पूर्ण वातानुकूलित दुमजली दर्शन रांग
- मुख्य हॉलमध्येच दर्शन पाससह लॉकर सुविधा काऊंटर
- 16 हजार लॉकरची सुविधा
- दर्शन रांगेत बसण्याची व्यवस्था असलेले 12 मोठे हॉल
- अंदाजे 11 हजार भाविक एकाचवेळी बसू शकतील अशी व्यवस्था
- पूर्ण फायर ऑडिट केलेली व भूकंपरोधक इमारत
- 48 दर्शनपास काऊंटर
- 25 लाडू, 10 उदी तर 10 पुस्तक विक्री काऊंटर
- विकलांग भक्तांसाठी रॅम्प व व्हीलचेअर व्यवस्था
- महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह
- दर्शन रांगेत चहा व बिस्किट स्टॉलची व्यवस्था
नव्याने बांधण्यात आलेल्या या दुमजली दर्शन रांगेमुळे देशभरातून आलेल्या भाविकांना साईबाबांचे दर्शन कमी वेळेत मिळणार आहे.