(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Radhakrishna Vikhe Patil : आजी महसूलमंत्र्याचे माजी महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन
Radhakrishna Vikhe Patil : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेर शहरात आज राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
अहमदनगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज माजी महसूलमंत्री थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. आज महाराष्ट्रात जनतेचं सरकार आहे. आघाडी सरकारमध्ये केवळ लुट सुरू होती. आघाडी सरकारच्या काळात राज्याची पिछेहाट झाली. तत्कालीन सरकारने मागच्या अडीच वर्षात केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम केलं. महाराष्ट्रातले मंत्री काय मग भजे खात होते का? असा हल्लाबोल विखे पाटील यांनी केला.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देखील महसूलमंत्री पद मात्र अहमदनगर जिल्ह्यातच राहिले आहे. एकमेकांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्याकडील महसूलमंत्री पद जिल्ह्यातीलच राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलं. महसूलमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रथमच राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केलं.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेर शहरात आज राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. विखे-पाटील यांचं संगमनेर शहरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत मुस्लिम कार्यकर्त्यांनी विखे यांचं स्वागत केलं. यानंतर शहरातील सय्यदबाब दर्ग्यावर चादर अर्पण केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोटार सायकलवर बसून कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सहभाग घेतला. तिथून पुढे शहरातून शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली.
"इतिहासात पहिल्यांदा एव्हढं मोठं भ्रष्टाचारी सरकार झालं. महाविकास आघाडी सरकारचा समान विकासाचा नाही तर समान वसुलीचा कार्यक्रम होता. या वसुलीच्या कार्यक्रमाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. अभद्र युतीमुळे शिवसनेचे चाळीस आमदार कधी निघून गेले कळलंच नाही. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिली होती की, माझं कुटुंब तुमची जबाबदारी, त्याचा परिणाम मंत्र्यांवर झाला, असा हल्लाबोल बाळासाहेब विखे-पाटील यांनी केला.
"अहमदनगर जिल्ह्यात तीन मंत्री असताना कोणीही जिल्ह्यात थांबला नाही. जो कोणी उठला तो कुटुंबाला घेऊन गावाबाहेर घेऊन गेला. संगमनेर तालुक्यात कोरोना काळात जनतेची आर्थिक लुट करण्यात आली. मी आज संगमनेरच्या सरकारी रुग्णालयाची माहिती घेतली. ज्याला इच्छा मरण पाहिजे त्यांनी तिथं जायचं अशी परिस्थिती आहे. सरकार म्हणून आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे आज बंधनातून मुक्त झालो असा उत्साह मला याठिकाणी दिसतोय, अशी टीका विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता केली.
"आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला आणि बगलबच्यांना थारा नाही. वाळू माफियांना तर बिलकुल थारा नाही. वाळू माफियांमुळे प्रपंच उघडे झाले, खून पडले. महिनाभरात वाळू विषयी सर्वकष धोरण आणणार. वाळू माफियांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. जर वाळू माफियांना माज आला असेल तर तर हे सरकार माज उतरविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा विखे-पाटील यांनी यावेळी दिला.