Shirdi Sai Baba : साई बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ, विकेंडला शिर्डीसह साईमंदिर गजबजलं!
Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साई मंदिरात (Sai Mandir) दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली असून सलग सुट्ट्यांमुळे लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.
Shirdi Sai Baba : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात (Sai Mandir) दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली असून सलगच्या सुट्ट्यांमुळे लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर शिर्डी शहरातील हॉटेल्स पर्यटनस्थळे (Tourisam) देखील हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.
शिर्डीच्या (Shirdi) साई मंदिरात दररोज हजारो भाविक दाखल होऊन दर्शन घेत असतात. तर अशातच शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत सलग सुट्ट्या असल्याने नगरी साई भक्तांनी ओसंडून वाहत आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून दर्शन रांगेत पाय ठेवायला देखील जागा नसल्याने सुरक्षा रक्षकांना मध्यस्थी करावी लागत आहे. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई भक्तांनी (Shirdi Sai Baba) मोठी गर्दी केली आहे. साई मंदिराच्या दर्शनरांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं चित्र आहे. शनिवार-रविवार आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होत आहेत.
देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं अवाहन केलं जातं आहे. शिर्डीत येणारे काही साईभक्त स्वतःहून मास्क वापरत असून अनेक साईभक्त मास्क वापरत नसल्याचं दिसून येत आहे. सरकारने अद्याप कुठलीही सक्ती केली नसली तरी गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत केंद्र सरकारने आवाहन केले आहे कि गर्दीच्या ठिकाणी जात असाल, तर स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा, त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर मास्क वापरणे महत्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.
रामनवमीलाही शिर्डीत गर्दी
दरम्यान रामनवमी दरम्यानही अशा पद्धतीने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिर्डीचा रामनवमीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद देणारा सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतूर झालेला भक्तगण साई मूर्तीची केवळ एक झलक पाहण्यासाठी आसुसलेले असतात. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील उर्जा भाविकांना वर्षभर पुरणारी असते. त्यामुळेच, हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक साई दरबारी दाखल होतात. त्यानंतर आजपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने भाविक शिर्डीत साईदर्शनासह विकेंड एन्जॉय करत आहेत.
भाविकांच्या संख्येत वाढ होणार
एकीकडे विकेंड सुरु असताना दुसरीकडे शिर्डी विमानतळाला नाईट लँडिंगची सुरुवात आजपासून होत आहे. त्यामुळे देखील भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. गेल्या काही कालखंडापासून यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. नाइट लँडिंगमुळे शिर्डीत पोहोचणं सुलभ होणार असून या परिसराच्या विकासाला सुद्धा गती मिळणार आहे.