Pravin Darekar BJP : शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला असताना, भाजप राष्ट्रवादीच्या संपर्कात; प्रवीण दरेकरांचा मोठा गौप्यस्फोट
Pravin Darekar BJP : शिंदे गटाचे आमदार (shivsena) हे जेव्हा गुवाहाटीला गेले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते.
Pravin Darekar BJP : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत आल्यानं याचा फायदा नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपला (BJP) निश्चितच होईल, कारण आज नरेंद्र मोदी पक्षापलीकडे जाऊन देशातील चांगले नेते म्हणून ओळखले जातात. देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच (Narendra Modi) व्हायला हवेत, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी बोलून दाखवला. त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये (Loksabha Election) नव्या महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असंही भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले.
भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे आज अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्याच्या राजकारणातील बदललेल्या समीकरणांसह विविध विषयांना अनुसरून भाष्य केले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर होती, असा दावा एबीपी माझाशी बोलताना केला होता. याबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, कोणाला काय ऑफर होती? हे पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्या नेत्यांना विचारलं की काय? याबाबत मला माहित नाही. परंतु, हा शेवटी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असतो, पण मला वाटत नाही, अशी काही ऑफर दिली गेली असेल.
शिंदे गटाचे आमदार (Shiv Sena) हे जेव्हा गुवाहाटीला गेले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. याबाबत प्रवीण दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांची पहिल्यापासून तशी इच्छा होती. जर राज्याला स्थिर सरकार पाहिजे, भक्कम सरकार पाहिजे, तर एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करूया, अशी भूमिका पहिल्या दिवसापासूनच होती, याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही, असं दरेकर म्हणाले. यावरून शिंदे गटाचे आमदार हे गुवाहाटीला असताना भाजप नेते हे राष्ट्रवादीच्या संपर्कात होते, या गोष्टीला दरेकर यांनी एकप्रकारे दुजोरा दिला आहे.
अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्याने शिंदे गटाचे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, अजितदादांच्या प्रवेशाने कोणी नाराज नाही, आमची मंडळी नाराज नाही आणि मला वाटतं जे काय व्हायचंय, ते दोन्ही पक्षाचा आब राखून, मान राखूनच होईल आणि तिन्ही पक्ष एकोप्याने राहणार आहेत. राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपली नाराजी, मान या पलीकडे जाऊन राज्यातल्या जनतेला स्थिर सरकार देऊन काम करण्याच्या भावनेतून एकत्र आले असल्याचे ते म्हणाले.
राज- उद्धव एकत्र येणार नाही...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत, अशी बॅनरबाजी काल मुंबई येथे करण्यात आली होती. या संदर्भात मला माहिती नसल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. तसेच ते दोघे एकत्र येतील, असं मला वाटत नाही, असं दरेकर म्हणाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे, हे सर्वात पहिले वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे ते देखील मोदींच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला. विरोधकांवर टीका करणे, ही संजय राऊत यांची ड्युटीच आहे. मात्र आमचे आमदार नितेश राणे हे त्यांना उत्तर देण्यास सक्षम असून ते त्यांचं तोंड बरोबर बंद करतात, असा टोला दरेकर यांनी राऊत यांना लगावला आहे.