(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kopargaon News : काळे-कोल्हे आले एकाच मंचावर, रंगला कलगीतुरा, कोपरगाव विधानसभेचं तिकीट कुणाला मिळणार?
Ahmednagar News : महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर प्रथमच आशुतोष काळे आणि स्नेहलता कोल्हे हे एका मंचावर आले.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनीही अजित पवारांना साथ दिली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) यांचा अवघ्या साडेआठशे मतांनी आशुतोष काळे यांनी पराभव केला होता. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर प्रथमच काळे आणि कोल्हे हे एका मंचावर आले. निमित्त होतं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीचं. नियोजनाच्या चर्चेबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटावरुन दोघांमध्येही रंगलेल्या कलगीतुऱ्याची कोपरगावात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
कोपरगाव विधानसभा (kopargaon Assembly) मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून काळे आणि कोल्हे या परंपरागत विरोधकांचा. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका काळे आणि कोल्हे हे एकमेकांविरोधातच उभे ठाकले आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील अनेक मतदारसंघातील राजकीय समीकरणे सुद्धा बदलली आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी सुद्धा अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार याची चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरू असतानाच शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आली.
या बैठकीत काळे आणि कोल्हे हे राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यावर प्रथमच एका मंचावर आले. नियोजनाची चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी स्नेहलता कोल्हे शेजारी बसलेल्या असताना मला अजितदादांनी तिकीट देण्याचा शब्द दिला असल्याचा पुनरुच्चार केला आणि सभागृहात एकच हशा पिकला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री, भाजपचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री अशी परिस्थिती आहे. म्हणून या महायुतीत तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन चालाव लागणार आहे. नवीन असल्यामुळे थोडासा गोंधळ होणार आहे, मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा त्यामुळे दादांनी सुद्धा सांगितले, तिकीट राष्ट्रवादीकडे राहिल. मात्र कोल्हे ताई बीजेपीच्या असल्याने काय करायचं हा प्रश्न राहणारच आहे. आम्हाला काहीतरी ठरवावे लागेल असं वक्तव्य आमदार आशुतोष काळे यांनी केलं.
अजून पुलाखालून बरच पाणी वाहून जायचं...
दरम्यान आशुतोष काळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांनी सुद्धा मला तिकीट मिळणार असल्याचा दावा केला आहे. अजून पुलाखालून बरच पाणी वाहून जायचं आहे. त्यांचे नेते त्यांना सांगतात, तसेच आमचे नेते सुद्धा एबी फॉर्म देऊ का, असा आम्हाला विचारतात. काय निर्णय घ्यायचा तो वरिष्ठ नेते घेतील, मात्र आज नियोजनाची बैठक असताना ते उत्साहाच्या भरात बोलून गेले, असा टोला भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांना लगावला. राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये अशाच प्रकारचा पेच आगामी काळात निर्माण होणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यातून मार्ग कसा काढणार आणि कोणाकोणाला तिकीट मिळणार, याकडेच अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष लागलं आहे.
इतर महत्वाची बातमी :