Radhakrishna Vikhe Patil : 'भावी मुख्यमंत्री सोडा, अगोदर आमदार तर व्हा'; राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरातांना डिवचलं
Shirdi Assembly Constituency : तुम्ही नुसतं लोकांची हसून जिरवली, आता जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद असल्याचे दिसून आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, मी तुम्हाला पाठिंबा देतो,’ असे आवाहन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीमधील दोन प्रमुख घटक पक्षांना केले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल, असे वक्तव्य केले होते. यानंतर बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे भावी मुख्य मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. आता यावरून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे (Shirdi Vidhan Sabha Constituency) भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बाळासाहेब थोरात यांना डिवचले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आपण नेहमीच मतदारसंघाच्या समतोल विकासासाठी प्रयत्न केले. मला कृषिमंत्री म्हणून संधी मिळाली होती, त्यावेळी शेतकऱ्यांना आपण भरघोस मदत केली. महसूलमंत्रिपदाच्या संधीचा उपयोग करत राज्यातील प्रलंबित प्रकल्प आपण पुन्हा सुरू केले. या जिल्ह्याला आधी महसूल मंत्री नव्हते का ? ते बाकीचा महसूल गोळा करण्यात व्यस्त होते, असे म्हणत त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.
जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही
विकासाची दृष्टी ठेवून काम करावं लागतं. शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केल्यावर माझ्यावर अनेक आरोप झाले. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करणे म्हणजे जिल्हा होत नाही. कोणताही निर्णय करताना त्याला धाडस लागतं नुसत हसून चालत नाही. तुम्ही नुसतं लोकांची हसून जिरवली, आता जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
अगोदर आमदार तर व्हा
शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून पाण्याचा कायदा संगमनेरवाल्यांनी केला. दहशतवादाचे बीज तुम्ही रोवलंय. संगमनेरच्या घटनेबाबत आम्ही माफी मागीतली, तुमची ती सुद्धा दानत नाही. तुमचा भाऊ आणि तुमचा स्विय सहायक लाठ्या काठ्या घेऊन होते, मग दहशत वाद कुणाचा? असा सवाल देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. जनता त्यांच्या पाठीशी नाहिये, वैफल्यातून त्यांच्याकडून हे सगळे प्रकार सुरू आहे. त्या दिवशी सुजयला मारण्याचा कट होता मी त्याचा जाहीर निषेध करतो, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. तुम्ही स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणतात, अगोदर आमदार तर व्हा, असा टोला देखील त्यांनी बाळासाहेब थोरातांना लगावला.
आणखी वाचा