कर्जत-जामखेडचे SRPF केंद्र लोकार्पण वादग्रस्त, रोहित पवारांना पोलिसांनी अडवलं, तगडा पोलिस बंदोबस्त
Karjat Jamkhed Kusadgaon SRPF Center : मविआ सरकारच्या काळात SRPF प्रशिक्षण केंद्र मंजूर झालं, मात्र महायुती सरकारच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र इतरत्र नेण्याच्या हालचाली झाल्या.
अहमदनगर : जामखेडच्या कुसडगावच्या SRPF केंद्राचे लोकार्पण वादग्रस्त ठरणार असल्याचं दिसून येतंय. आमदार रोहित पवारांनी मंजूर केलेल्या या केंद्राचे लोकार्पण माजी मंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या हस्ते होणार आहे. मात्र त्या आधीच पोलिसांनी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आणि रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आत जाण्यात मज्जाव केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी केंद्राच्या बाहेरच ठिय्या मांडला आणि देवेंद्र फडणवीस, आमदार राम शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी चार चाकी वाहने, लोखंडी बॅरॅकेट्स आणि लाकडाच्या सहाय्याने रस्ता बंद केला.
प्रशासनाने परवानगी नाकारली
अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र झाले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आमदार रोहित पवार केलं होतं. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. या ठिकाणी आलेल्या आमदार रोहित पवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं. संबंधित केंद्राचे काम अद्याप 100 टक्के पूर्ण झालेलं नाही.
काय म्हणाले रोहित पवार?
यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कर्जत-जामखेडचं SRPF केंद्र दुसऱ्या जिल्ह्यात गेलं असताना त्याविरोधात एक ब्र शब्द काढण्याचीही इथल्या तत्कालीन लोकप्रतिनिधीची मंत्री असूनही हिंमत झाली नाही. पण मविआ सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी हे SRPF केंद्र पुन्हा कुसडगाव (ता. जामखेड) इथं मंजूर केल्याने ते आज सुरु झालंय. त्याच देशमुख साहेबांना आणि ज्यांनी 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्जतचा ST डेपो मंजूर केला त्या अनिल परब साहेबांना या केंद्राची पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी ‘एसआरपीएफ’ केंद्राच्या वाटेत चक्क काटे, बॅरिकेट्स आणि 200 पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचं काम एका अहंकारी स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावर सरकार करतंय. पण स्वाभिमानी कर्जत-जामखेडकर त्यांचा अहंकार चिरडल्याशिवाय राहणार नाही आणि याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ!
मविआ सरकारच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र मंजूर झालं मात्र महायुती सरकारच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र इतरत्र नेण्याच्या हालचाली झाल्या. यावरून आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचात श्रेयवाद रंगल्याचं दिसतंय.
केंद्र जळगावला नेण्याच्या हालचाली
- जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे नव्याने सुरू होणारे एसआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र मविआ सरकारच्या काळात करण्याचा निर्णय झाला होता.
- बांधकाम करण्यासाठीची 34 कोटी 37 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 22 जून 22 ला या प्रशिक्षण केंद्राला कार्यारंभ आदेशही देण्यात होता.
- मात्र राज्यात महायुती सरकार आल्यानंतर हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जळगावच्या वरणगावला हलविण्याच्या हालचाली झाल्या.
- आमदार संजय सावकारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे प्रशिक्षण वरणगाव येथे मंजूर करण्यात आले होते ते पुन्हा वरणगावलाच व्हावं अशी विनंती केली होती.
- त्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी 'प्रशिक्षण केंद्र हे वरणगाव येथे मंजूर होते ते अन्यत्र हलवले असल्यास तो निर्णय स्थगित करून पुनश्च वरणगाव येथे केंद्र करण्यात यावे' असा शेरा मारला होता. त्यावरून राजकारण तापलं होते.