(Source: Poll of Polls)
Gautami Patil : गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल, तोफखाना पोलिसांचा आक्रमक पवित्रा
FIR Against Gautami Patil : नगरमधील एका कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिच्यावर आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर: नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे नृत्यांगना पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याबद्दल नगरमधील गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरूवारी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी कलम 188,283,341, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 2,15 आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 चे कलम 3,4 5, 6 आणि मु.पो.का.क 37 (1) (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
परवानगी नाकारली तरीही कार्यक्रम
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना या आधी कोल्हापुरात परवानगी नाकारण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या तिच्या कार्यक्रमांना कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन नाकारण्यात आलं होतं. नगरमधल्या कार्यक्रमालाही परवानगी देण्यात आली नव्हती अशी माहिती आहे.
आताच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असली तरीही आयोजकांनी हा कार्यक्रम केला आणि त्यामुळे पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. पोलिसांनी या कार्यक्रमाचे आयोजक, गौतमी पाटील, तिचा मॅनेंजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामुळे रस्त्यावरील रहदारीला अडचण झाल्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आधी गौतमी पाटीलने एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की, ती कोणताही कार्यक्रम स्वीकारण्यापूर्वी त्याला पोलीस परवानगी मिळाली आहे की नाही याची खात्री करते आणि मगच कार्यक्रम स्वीकारते. आता तिच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली नव्हती तरीही तीने कार्यक्रम केल्याने चर्चा केली जात आहे.
ही बातमी वाचा: