छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंतप्रधानांची आस्था अन् प्रेम खोटं, काँग्रेस नेत्याचा प्रहार
PM Narendra Modi : पंतप्रधानांची महाराजांबद्दलची आस्था आणि प्रेम खोटं आहे. निवडणुका तोंडावर आल्यामुळे त्यांनी माफी मागितली, अशी टीका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केली आहे.
अहमदनगर : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो. जे शिवछत्रपतींचा आदर करतात, त्यांना पूजतात, त्यांचीही मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले. आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. आता यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र या घटनेचा निषेध करत आहे. पंतप्रधानांची महाराजांबद्दलची आस्था आणि प्रेम खोटं आहे. निवडणुका तोंडावर आल्यामुळे त्यांनी माफी मागितली. पंतप्रधान मोदींनी भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची केलेली तुलना ही चुकीची आहे. 100 वर्षांपूर्वी बांधलेले पुतळे देखील आज सुरक्षित आहेत. सत्ताधारी केवळ सत्तेसाठी हपापलेले आहेत. त्यांचे महापुरुषांविषयीचे प्रेम खोटं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
आमच्या लाडक्या बहिणी भोळ्या नाहीत
लाडकी बहीण योजनेवरून बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, केवळ याच योजनेवर आता सरकारला भरोसा आहे. मात्र आमच्या लाडक्या बहिणी देखील हुशार आहेत. बदलापूरच्या घटनेतील जाब याच बहिणी विचारतील. मुख्यमंत्र्यांनी खरंतर राजीनामा द्यायला हवा होता. मात्र यांना सत्ता हवी आहे. त्यासाठी निवडणुका देखील पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र आमच्या लाडक्या बहिणी भोळ्या नाहीत त्या सरकारला त्यांची जागा दाखवतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
भाजपाचं खरं रूप उघडं झालं
ते पुढे म्हणाले की,महाविकास आघाडीत जागावाटप एकमताने होईल. मात्र महायुतीतील वाद किती टोकाला जातील हे आता दिसू लागले. काही जणांना तर एखादं नाव समोर आला तर ओकाऱ्या होतात हे देखील ऐकलं. त्यांचा संघर्ष हा पाहण्यासारखा असेल. चक्की पीसिंग व भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आज त्यांच्याबरोबर आहे. याविषयी जनतेत रोष आहे, ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनाच सत्तेत घेऊन तिजोरीच्या चाव्याच देण्यात आल्या.भाजपाचं खरं रूप आता उघडं झालं आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह भाजपवर निशाणा साधला.
आणखी वाचा