Maharashtra Assembly Election 2024 : निलेश लंकेंच्या पारनेर मतदारसंघात संघर्ष पेटण्याची चिन्ह, जागा आम्हाला सोडा नाहीतर मविआत बंडखोरी होणार, ठाकरेंच्या सेनेचा इशारा
Parner Assembly Constituency : अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वेध लागले आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून अनेक इच्छुकांची नावे दररोज समोर येत आहे. आता अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातील बहुचर्चित पारनेर विधानसभा मतदारसंघात (Parner Assembly Constituency) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणूक आता जवळ येत असून प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेला पारनेर विधानसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीमध्ये चांगलाच संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत असून हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी केली आहे.
पारनेर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला
या मतदारसंघात आमदार निलेश लंके यांनी पदाचा राजीनामा देऊन खासदारकी लढवली आणि ते लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आता त्यांच्या जागी येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी राणी लंके उभ्या राहणार असल्याचे संकेत खुद्द खासदार निलेश लंके यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राणी लंके सध्या पारनेर नगर मतदारसंघात विविध कार्यक्रमांसह मतदारांच्या भेटी घेत आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने मोठे मन करून निलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती.
वेळप्रसंगी बंडखोरी होईल, ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट इशारा
त्यामुळे आता खासदार निलेश लंके यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आमदारकीला हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी सोडावा, अन्यथा शिवसैनिक अन्याय सहन करणारे नसतात, वेळप्रसंगी बंडखोरी होईल, असा थेट इशाराही संदेश कार्ले यांनी दिलाय. आता महाविकास आघाडीत हा मतदारसंघ नेमक्या कुणाच्या वाटेला येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून हर्षदा काकडे इच्छुक
अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये (Shevgaon Pathardi Assembly Constituency) इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांच्या भूमिकेने भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, मात्र आता मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा अपक्ष निवडणूक लढवायची असा निश्चय त्यांनी केला आहे.
आणखी वाचा
श्रीगोंदा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, शरद पवार कुणाला तिकीट देणार?