(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shrigonda Assembly Constituency: भाजपचे शिवाजी कर्डीले श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत? आता बबनराव पाचपुतेंचं काय होणार?
Maharashtra Politics: आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात जोरदार राजकीय चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक हारल्याने सुजय विखे-पाटील मतदारसंघाच्या शोधात आहेत. शिवाजीराव कार्डिलेही पर्यायी मतदारसंघाच्या शोधात असल्याची चर्चा.
अहमदनगर: भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणारे माजी आमदार शिवाजी कर्डीले (Shivaji Kardile) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र, याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे शिवाजी कर्डीले यांनी म्हटले. या सगळ्या घडामोडीनंतर शिवाजी कर्डीले हे श्रीगोंदा विधानसभा (Shrigonda assembly constituency) मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरू आहे.
सुजय विखे-पाटील यांनी राहुरीतून लढण्याचा मनोदय व्यक्त केल्याने कर्डिले यांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच यामुळे कर्डिले-विखे हा वाद पु्न्हा उफाळून येण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, या सगळ्याबाबत शिवाजी कार्डिले यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. मला पैलवानकीचा छंद आहे. त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो, तरच तो फडात यशस्वी होतो. तसेच मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असेही कर्डीले म्हणाले. दरम्यान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. याच मतदारसंघातून शिवाजी कर्डीले यांचं नाव समोर येत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सुजय विखे पाटील कोणाविरोधात लढणार? बाळासाहेब थोरात की प्राजक्त तनपुरे?
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता सुजय विखे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. संगमनेर (Sangamner) किंवा राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी असून पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केल्याची माहिती सुजय विखे पाटील यांनी दिली होती. सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्याचा थेट सामना बाळासाहेब थोरात यांच्या रंगू शकतो. संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात हे सध्या विद्यमान आमदार आहेत. तर सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपुरे विरूद्ध सुजय विखे अशी लढत होईल. सुजय विखे राहुरीतून विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास शिवाजी कार्डिले यांनी पर्यायी मतदारसंघ म्हणून श्रीगोंदा मतदारसंघाकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे. मात्र, कार्डिले श्रीगोंद्यात आल्यास बबनराव पाचपुते काय करणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
निराश होऊ नका, मी 3 महिन्यांत आपलं सरकार आणतो, देवेंद्र फडणवीसांचा भाजप कार्यकर्त्यांना शब्द