Sujay Vikhe Patil: मी कायमचा इकडेच येईन! भाजपची पहिली लोकसभा उमेदवार यादी जाहीर अन् सुजय विखे-पाटलांचा सूर बदलला
Loksabha Election 2024: भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. महाराष्ट्रातून भाजप कोणाला उमेदवारी देणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे.
अहमदनगर: भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 195 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. अशातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुजय विखे-पाटील यांना भाजपकडून (BJP) लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची कुजबूज सुरु झाली आहे. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरच्या जनतेशी संवाद साधताना, 'तुम्ही खासदार करुन मला दूर लोटलंत. थोडे दिवस थांबा, मी कायमचा इकडे येईन', अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत भाजप धक्कातंत्राचा वापर करणार का, याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सुजय विखे-पाटील नेमकं काय म्हणाले?
सुजय विखे-पाटील शनिवारी शिर्डीच्या नजीक असलेल्या राहता येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी सुजय विखे यांनी उपस्थितांशी संवाद साधतान म्हटले की, "शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो. मात्र, तुमच्यापासून दुरावला गेलो आहे. दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच (शिर्डी) येईल. काळजी करु नका.", असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले. सुजय विखे-पाटील यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुजय विखे यांची ही बदललेली भाषा म्हणजे त्यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, याबद्दल कुणकुण लागल्याचा परिणाम आहे किंवा त्यांना यंदाच्या लोकसभेला निवडून येण्याबाबत साशंकता वाटत आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सुजय विखे बॉलीवूडच्या गाण्यावर थिरकतात तेव्हा....
जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगरच्या शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सवात भाजप खा. सुजय विखे-पाटील "मैं हू डॉन..." गाण्यावर ठेका धरताना दिसले. सुजय विखेंचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातोय. जागतिक महिला दिनानिमित्त भाजपकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. शेवगाव येथे कार्यक्रमात सुदेश भोसले यांनी गायलेल्या "मै हू डॉन" गाण्यावर सुजय विखेंनी ठेका धरला.
आणखी वाचा
खासदार सुजय विखे पाटील आणि गौरव मोरे यांचा 'वन-टू- का फोर' गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ
मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी-शाहांकडून कोणाला संधी?