अजितदादा परत आमच्याबरोबर या : राधाकृष्ण विखे पाटील
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांना दिलेल्या सल्ल्यामुळे खळबळ माजली आहे. अजितदादा हे स्पष्टवक्ते आणि खरे बोलणारे नेते असून त्यांनी आता आमच्याबरोबर परत या, असं विखे पाटील म्हणाले.
शिर्डी : "अजितदादा हे स्पष्टवक्ते आणि खरे बोलणारे नेते असून त्यांनी आता आमच्याबरोबर परत या," असा सल्ला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. निमित्त होतं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रगट मुलाखतीचे. याच मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी असल्याचं सांगताना चुकीच्या सल्लागारांच्या गराड्यात ते अडकले असून त्यातून त्यांनी बाहेर येण्याचा सल्ला दिला. अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी घेतलेल्या मुलाखतीत विखे पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बंधू राजेंद्र विखे यांनी प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या उपस्थितीत प्रगट मुलाखत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी विखे पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना शेवटच्या टप्प्यात फायर राऊंडमध्ये विचारलेल्या प्रश्नावर विखे पाटील यांनी अजित पवार स्पष्टवक्ते आणि खरे बोलणारे असून त्यांनी आता आमच्याबरोबर यावे, असा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याचवेळी देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक आणि आक्रमक नेते असून त्यांनी लवकर भाजपचं सरकार राज्यात आणावं, अशी विनंती केली. तर उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विखे पाटील यांनी मुख्यमंत्री संयमी आणि मितभाषी असल्याचं सांगत चुकीच्या सल्लागारांच्या गराड्यात ते सापडले असून त्यांना बाजूला करावं, असा सल्ला दिला.
मुलाखतीमधील प्रश्न
1. प्रश्न - वेळेच्या बाबतीत तुम्ही काटेकोर आहात पण तुमच्या हातात घड्याळच नाही
उत्तर - 1975 साली परीक्षेसाठी खासदार बाळासाहेब विखेंनी घड्याळ दिलं त्यानंतर मी त्यांना परत केलं. पण मी घड्याळ घातलं नाही परत, त्याचा फायदा आज झाला. घड्याळाबरोबर माझा संबंध आला नाही.
2. प्रश्न - तुम्ही अनेक वर्षे अनेक पदं उपभोगली, मात्र मुख्यमंत्री पदावर आपली चर्चा कधीच झाली नाही
उत्तर - चर्चा झाली तर पद मिळत नाही. अनेकांची नाव चर्चेत येतात मात्र ते त्यांना मिळत नाही. आम्ही जनतेसाठी काम करतोय. मानसिक समाधान कामात आहे
3. प्रश्न - विखे आणि पवार कुटुंबातील संघर्षाचं कारण काय?
उत्तर - आमचा व्यक्तिगत संघर्ष नव्हता. शरद पवार यांचे बंधू आमच्याकडे नोकरीला होते. मात्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रति होणाऱ्या चर्चेत वडील बाळासाहेब विखेंनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. त्याकाळी असलेले गट, तेव्हापासून मतभेद निर्माण झाले आणि दरी वाढत गेली. गेल्या लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य नव्हती. ती त्यांनी घ्यायला नको होती. काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही राहिली पाहिजे ही भूमिका माझ्या वडिलांनी राजीव गांधीच्या काळात घेतली. त्यावेळी हे सर्व बरोबर होते आणि नंतर विरोधात गेले. मात्र आमची तेव्हापासून तत्वाची लढाई होती आणि आजही तीच कायम आहे.
दरम्यान तासभर चाललेल्या या मुलाखती दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर देत आठवणींना उजाळा दिला. याशिवाय कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी दिलेली उत्तर आणि कौटुंबिक किस्से हे या मुलाखतीचं वैशिष्ट्य ठरलं. तर सुजय विखे यांनी श्रद्धा आणि सबुरी या मंत्राचा अवलंब करावा असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.