Shirdi News : सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा, 82 विद्यार्थी शिर्डी संस्थानच्या रूग्णालयात दाखल
Ahmednagar Shirdi Latest News update : शिर्डीला शालेय सहलीसाठी आलेल्या 82 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांवर साई संस्थानच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ahmednagar Shirdi Latest News update : अमरावतीहून शिर्डीला शालेय सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरूवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी शिर्डी साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहलीला आलेल्या 227 विद्यार्थ्यांपैकी 88 जणांना त्रास झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. प्रतिम वडगावे यांनी दिली. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या सहा शिक्षकांना देखील विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूलच्यावतीने शालेय सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबादवरून शेवगाव येथे सहल पोहोचल्यानंतर सायंकाळच्या वेळी तेथे विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवण्यात आलं होतं. जेवण जेवल्यानंतर काही वेळाने शिर्डी जवळ विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 227 विद्यार्थ्यांपैकी 88 विद्यार्थ्यांना त्रास जाणवला. या सर्व विद्यार्थ्यांवर शिर्डीच्या साई संस्थानच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले.
"ज्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना आज डिस्चार्ज मिळेल तर ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांना एक दोन दिवसात डिस्जार्च मिळणार असल्याची माहिती आहे. दुषित पाण्यामुळे त्रास झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देवगड मुक्कामी आल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीत येण्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी शेवगावजवळ दुपारचे जेवण केले. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी शिर्डीत दाखल होत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा रात्रीचा मुक्काम देवगड येथे होता. देवगड येथील मुक्कामी जात असताना विद्यार्थी आणि काही शिक्षकांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यामुळे सोबत असणाऱ्या इतर शिक्षकांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले.
पाणी बदलामुळे उलट्या झाल्याचा अंदाज
काही विद्यार्थ्यांना तापही येऊ लागल्याने खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखीखाली ठेवलं आहे. या मुलांनी बाहेर कुठे काही खाल्लं नसल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. शिवाय जेवण तयार करण्याची सामुग्रीही त्यांच्यासोबत असल्याचं शिक्षकांकडून सांगितलं जात आहे. पाणी बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले असावेत, असा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आलं नाही.
महत्वाच्या बातम्या