Kubeshwar Dham Sehore : धार्मिक आयोजनादरम्यान गोंधळ, हजारो लोकांची गर्दी; अनेक महिला बेपत्ता
Kubeshwar Dham : मालेगावातील एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक महिला भाविक बेपत्ता आहेत.
Rudraksh Mahotsav in Sehore : मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे एका धार्मिक आयोजनादरम्यान झालेल्या गोंधळातून मोठा हाहा:कार माजला आहे. तब्येत बिघडल्यामुळे हजारो जण रुग्णालयात दाखल झाले आहेत तर शेकडो महिला भाविक अजूनही बेपत्ता आहेत. सीहोर येथील कुबेश्वर धाम येथे शिवपुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातील जवळपास सहा ते सात लाख भाविक या ठिकाणी एकाच दिवशी पोहोचल्याने व अपूर्ण नियोजनामुळे झालेल्या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपला दौरा रद्द करावा लागला.
जवळपास दहा किलोमीटर लांबीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. कुणी आसामवरून, तर कुणी कर्नाटक तर कुणी गुजरात मधून आले होते. मध्य प्रदेशातील सिहोर या छोट्याशा गावाजवळ असलेल्या कुबेश्वर धाम येथे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी आयोजित केलेल्या शिवपुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवासाठी हजारो लोक जमले होते. या शिवपुराण कथेची आणि रुद्राक्ष महोत्सवाची त्यांनी गेल्या तीन महिन्यापासून जाहिरात केली होती. जो या शिवपुराण कथा ऐकायला येईल त्याला इथूनच एक रुद्राक्ष दिला जाईल आणि हा रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते पाणी पिल्यास आपल्यावरील सर्व संकट दूर होतात, असा दावाही प्रदीप मिश्रा यांनी केला होता. त्यामुळे देशभरातून या ठिकाणी भाविक येण्याची शक्यता होती. 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी असा कथावाचन व महोत्सवाचा कार्यक्रम होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी म्हणजे 16 तारखेला कथा ऐकण्यासाठी 15 तारखेपासूनच या ठिकाणी गर्दी होऊ लागली. देशभरातून आलेल्या जवळपास सहा ते सात लाख भाविक आणि त्यांच्या वाहनांमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी इतकी मोठी होती की अभूतपूर्व म्हणण्याची वेळ आली. मात्र या ठिकाणी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती, त्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत या ठिकाणी पोहोचायला बराच वेळ लागला. या ठिकाणी रुद्राक्ष महोत्सवादरम्यान आपल्याला रुद्राक्ष मिळेल या आशेने लाखो भाविक एकाच ठिकाणी जमले. त्यातच चेंगराचेंगरी होऊन हजारो महिला यात जखमी झाल्या तर मोबाईल नेटवर्क सुद्धा क्रश झाले. तसेच येथील शेकडो महिला या बेपत्ता झाल्या आहेत.
महाराष्ट्रातूनही जवळपास सर्वच जिल्ह्यातून या शिवपुराण कथा ऐकण्यासाठी व रुद्राक्ष मिळवण्यासाठी विशेषतः महिला भाविक मोठ्या संख्येने दाखल होते. अकोला ,अमरावती, बुलढाणा, नाशिकसह इतरही जिल्ह्यातील अनेक महिला गेल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी लाखोंच्या गर्दीत त्या बेपत्ता झाल्यात. अनेक महिला या सापडल्यात तर अजूनही अनेक महिला बेपत्ता आहेत. आज या गर्दीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका महिलेची तब्येत बिघडल्याने मृत्यू झालेला आहे. तर या गर्दीमुळे व चेंगराचेंगरीमुळे हजारो भाविकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या आहेत.
आणखी वाचा :