Ahmednagar News : बाहेरुन कीर्तन आतून तमाशा, राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर टीका
Ahmednagar News : केजरीवाल यांनी पवारांविषयी काय उद्गार काढले आणि केजरीवाल यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी काय उद्गार काढले आहेत ते जरा तपासा. त्यामुळे बाहेरुन कीर्तन आणि आतून तमाशा विरोधकांचा चालला आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
Radhakrishna Vikhe Patil : "विरोधकांच्या मोट बांधणीला काही अर्थ नाही ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात प्रतिमा उंचावत चालली आहे, त्यामुळे विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत आहे. त्यांना आपले स्वतःचे दुकाने बंद होण्याची भीती वाटत आहे म्हणून ते एकत्र येत आहेत. नाहीतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शरद पवारांविषयी (Sharad Pawar) काय उद्गार काढले आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काय उद्गार काढले आहेत ते जरा तपासा. त्यामुळे बाहेरुन कीर्तन आणि आतून तमाशा विरोधकांचा चालला आहे," अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे, ते अहमदनगरमध्ये (Ahmednagar) बोलत होते
विरोधकांना पोटशूळ का उठला आहे?
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सामनामधून टीका करण्यात आली की विरोधकांची नावे या निमंत्रण पत्रिकेत यायला हवी होती. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले की, त्यांची ही टीका व्यक्तीदोषातून करण्यात आलेले आहे. जगामध्ये भारत हा समृद्ध आणि ताकदवान देश म्हणून पुढे येत आहे. त्यातच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे जगाने स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते संसदेचे उद्घाटन होत असताना विरोधकांना पोटशूळ का उठला आहे? एक आदिवासी महिलेने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दाखल केली होती त्यावेळी विरोधकांनी त्यांना सहकार्य का केलं नाही असाही सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
'जागावाटपावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद नाहीत'
जागावाटपावरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. जागा वाटपावरुन दोन गटांमध्ये मतभेद असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे यांनी आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. जरी एखाद्या पक्षाचा नेता जागा वाटपाबाबत बोलत असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात काँग्रेस मूठभर राहिलीय
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार नाना पटोले यांच्यामध्ये सुद्धा राजकीय कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे असे राधाकृष्ण विखे म्हणाले. तसंही महाराष्ट्रात काँग्रेसला कुठलं स्थान आहे, काँग्रेस मूठभर राहिली आहे अशी टीका राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेस नेते हे मंत्रिमंडळात सत्ता मिळावी म्हणून हापापलेले आहेत, मंत्र्यांना सगळं काही मिळालं. पण काँग्रेस कार्यकर्त्यांना काहीही मिळालं नाही याबाबत कार्यकर्त्यांना विचारला हवं असं राधाकृष्ण विखे म्हणाले.