Ahmednagar News: बनावट आधार कार्डचा वापर करून सिम कार्ड केले अॅक्टिव्ह, पोलिसांनी केली सिम कार्ड विक्रेत्यांवर कारवाई
Ahmednagar News: अहमदनगर येथे बनावट आधार कार्डचा वापर करून सिम कार्ड अॅक्टिव्ह केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Ahmednagar News: बनावट आधार कार्डच्या माध्यमातून सिम कार्ड अॅक्टिव्ह (Sim Card) केल्याप्रकरणी पोलिसांनी सिम कार्ड विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सर्व पोलीस अधीक्षकांना त्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर अहमदनगर येथे दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून दोन जणांना ताब्यात घेतल आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी जवळपास 180 सिम कार्ड जप्त केले आहेत.
राज्यातील 75 सिम कार्ड विक्रेत्यांकडून बनावट आधार कार्ड आणि फोटोचा गैरवापर करत एकाच नावाने अनेक सिम कार्ड नोंदवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विक्रेत्यांनी हजारो सिम कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केले आहेत. अहमदनगर (Ahamadnagar) शहरातील तागड वस्ती येथून एका सिम कार्ड विक्रेत्याला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर पोलिसांनी त्याच्याकडून 108 सिम कार्ड जप्त केले आहेत. पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील एका सिम कार्ड विक्रेत्याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून 72 सिम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. मोबाईल टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या कंपनीचे सिम कार्डची जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी विक्रेत्यांना अनेक प्रलोभने दिली आहेत. पण विक्रेत्यांनी मात्र या प्रलोभनाचा गैरफायदा घेतल्याचं चित्र आहे.
विक्रेत्यांनी ग्राहकांकडून मिळालेला आधार कार्ड आणि फोटोंचा गैरवापर करत एकाच्याच नावे अनेक सिम कार्ड विक्री केल्याचं दाखवत कंपन्यांचीही फसवणूक केली असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच यामधून आणखी कोणते गैरप्रकार तर घडले नाहीत ना या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे यामध्ये फक्त कंपनीची फसवणूक झाली आहे की इतर काही गैरप्रकार घडले आहेत यासंदर्भात देखील पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
बनावट आधारकार्डच्या आधारे सिम कार्ड अॅक्टिव्ह करण्याचा हा प्रकार काही महिन्यांपूर्वीचा असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. कारण आता नवीन सिम कार्ड घेण्यासाठी कागद पत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने होते. त्यामुळे आता असा प्रकार करणं अशक्य असल्याचं काही विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.
फक्त पैसे कमवण्यासाठी हा गैरप्रकार घडला असल्याचं देखील पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. तसेच जर चुकीच्या पद्धतीने जे सिम कार्ड अॅक्टीव्ह करण्यात आले आहेत ते जर चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेले तर कायदा आणि सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो.