बिहार निकालाचे आफ्टरइफेक्ट्स, काँग्रेसचं चिंतन, भाजपचं 2024 मिशन
बिहार निकालानं दोन राष्ट्रीय पक्षांच्या वाटचालीवरही तितकाच परिणाम केलाय. निकालाला एक आठवडा उलट्यानंतर एकीकडे काँग्रेस अखेर चिंतनात गुंतली आहे. तर दुसरीकडे उत्साह वाढलेल्या भाजपनं लोकसभेच्या दृष्टीनं मेगा प्लॅन आखला आहे.
पाटना : काँग्रेस आणि भाजप देशाच्या राष्ट्रीय राजकारणातले दोन प्रमुख पक्ष. पण सध्या दोन पक्षांच्या कार्यशैलीत टोकाचा फरक दिसतोय. बिहार निकालानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु झालाय. त्याबाबत आत्मचिंतन करण्यासाठी आज बैठक होत आहे. तर दुसरीकडे भाजपनं मिशन 2024 वर लक्ष्य केंद्रीत करत आपली तयारी सुरु केली आहे.
एकीकडे काँग्रेसचं बिहारवर मंथन तर दुसरीकडे भाजपचं 2024 मिशन. बिहारची निवडणूक जरी आरजेडी-जेडीयूतली लढत मानली गेली. तरी या निकालानं दोन राष्ट्रीय पक्षांच्या वाटचालीवरही तितकाच परिणाम केलाय. निकालाला एक आठवडा उलट्यानंतर एकीकडे काँग्रेस अखेर चिंतनात गुंतली आहे. तर दुसरीकडे उत्साह वाढलेल्या भाजपनं लोकसभेच्या दृष्टीनं मेगा प्लॅन आखला आहे.
सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी नेमल्या गेलेल्या विशेष सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. बिहार निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडत आहे. अहमद पटेल, के सी वेणुगोपाल, ए के अँटोनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला हे या समितीचे सदस्य आहेत. यापैकी अहमद पटेल हे अत्यंत गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेतायत. त्यामुळे ते वगळता इतर सदस्यांची ही बैठक होणार आहे.
कपिल सिब्बल यांनी कालच बिहारच्या निकालावर पक्षाला घरचा आहेर दिला होता. बिहार आणि देशात अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमधला पराभव ही गोष्ट पक्षनेतृत्वाला कदाचित सामान्य वाट असावी, त्यामुळे त्यांनी अद्याप त्यावर चिंतन केलं नसावं, असं सिब्बल म्हणाले होते. त्यावर अशोक गहलोत यांनी त्याला जाहीरपणेच उत्तरही दिलं. एकीकडे काँग्रेस बिहारच्या पराभवाची कारणं शोधण्यात गुंतलीय तर दुसरीकडे भाजपचं मिशन 2024 आत्तापासूनच सुरु झालंय. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा हे 100 दिवसांचा देशव्यापी दौरा करणार आहेत..
2019 ची लोकसभा निवडणूक संपून आत्ता कुठे दीड वर्ष झालं आहे. पुढच्या निवडणुकीला अजून साडेतीन वर्षे बाकी आहेत. पण त्याआधीच नड्डा यांचा हा दौरा सुरु होतोय. विशेष म्हणजे अमित शाह ज्यावेळी अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनीही अशाच पद्धतीने इतक्या आधी लोकसभेची तयारी सुरु केली होती.
ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही, तिथे शिरकाव करण्याच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा असणार आहे. केवळ एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकणं हा एखाद्या सरकारचा कार्यक्रम असू शकत नाही. पण मोदींच्या नेतृत्वात भाजपनं 2014 पासूनच हे आक्रमक विस्ताराचं धोरण राबवलं आहे. जनतेसाठी महत्वाची असतात सरकारची ध्येयधोरणं. पण दोन राष्ट्रीय पक्षांच्या कार्यशैलीतला फरक मात्र यानिमित्तानं ठळक उठून दिसतोय. भाजपची तयारी जोरात सुरु झालीय. दुसरीकडे काँग्रेस मात्र नेतृत्वाच्या शोधात आहे. पक्षाला अजूनही पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाहीय.