महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Shiv Sena UBT : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गट आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय.
Manisha Kayande on Shiv Sena UBT : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) आत्मविश्वास बळावलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.
मनीषा कायंदे म्हणाल्या की, महाविकास आघाडी होती, आता इतिहास जमा झाली आहे, ही फुटली याचे खापर आता ते एकमेकांवर फोडत आहेत, आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. ती कोणी करायची हे फक्त बाकी आहे. ही स्वार्थ पोटी तयार झालेली आघाडी होती. नेत्यांच्या मुलामुलींचे भविष्य चांगले करण्यासाठी ही आघाडी तयार करण्यात आली होती. लोकसभेत सर्वात जास्त स्ट्राईक रेट आमचा होता, विधानसभेत आम्ही जास्त जागा घेतल्या, लोकांनी दाखवले खरी शिवसेना कोण आहे. निवडणूक आयोगाने देखील आम्हाला चिन्ह आणि नाव दिले, त्यांना सर्वात जास्त नुकसान काँग्रेसमध्ये झाले आहे, शिवसैनिकांना तो निर्णय आवडलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेबांची माफी मागायला हवी
त्या पुढे म्हणाल्या की, महायुतीत आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढलो, त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीबाबत अजून निर्णय बाकी आहे, त्याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा विरोध केला त्यांच्या विचारांना त्यांच्या मुलाने तिलांजली दिली, त्यांनी आता नाक घासून बाळासाहेबांची माफी मागायला हवी. आता महानगरपालिका आल्याने पुन्हा त्यांना बाळासाहेब आणि हिंदुत्व आठवले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे लागतात, अशी घोषणा त्यांनी केली.
आणखी वाचा