(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Covid Update : जिल्ह्यात दिवसभरात 176 नव्या कोरोना बाधितांची नोंद
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बाधितांना रुग्णालयात भरती होण्याची गरजही पडत आहे. सध्या जिल्ह्यात 27 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नागपूरः जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. यातच आता शनिवारी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात 176 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात शहरातील 125 आणि ग्रामीण भागातील 51 बाधितांचा समावेश आहे. सध्या शहरातील सक्रिय कोरोनाबाधित संख्या 1077 वर पोहोचली आहे. त्यामुळे आता नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात शनिवारी यासोबतच आज 176 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यात शहरातील 94 आणि ग्रामीणमधील 18 बाधितांचा समावेश आहे. सध्या स्थितीत शहरात 742 कोरोना बाधित सक्रिय असून ग्रामीणमध्ये 335 बाधित सक्रिय आहेत. आज शहरात 1308 जणांची तर ग्रामीणमध्ये 310 जणांची अशा एकूण 1618 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर 368 रॅपिड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या.
27 कोरोना बाधित रुग्णालयात भरती
सध्या 27 कोरोना रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. यापैकी 9 बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात, 1 बाधित मेयो मध्ये, 3 बाधित किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी येथे, गंगा केअर हॉस्पिटलमध्ये 3 बाधित, सेंट्रल एव्हेन्यू क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये 1, शुअरटेक हॉस्पिटलमध्ये 1 , क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये 2 आणि मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये 3 बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर 1050 बाधित गृहविलगीकरणात आहेत.
विभागातही नागपूर टॉपवर
नागपूर विभागात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आढळून येणाऱ्या बाधितांमध्ये नागपूर जिल्हा टॉपवर असून येथे 176 नव्या बाधितांची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यात 29, चंद्रपूर जिल्ह्यात 16, गोंदिया जिल्ह्यात 5, वर्धा जिल्ह्यात 3 आणि गडचिरोली जिल्ह्यात 2 नव्या बाधितांची नोंद झाली.
देशातील कोरोना रूग्णांमध्ये वाढ
देशात आज सलग तिसऱ्या दिवशी वीस हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सक्रिय कोरोना रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20,044 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे पावसामुळे वाढणारे संसर्गजन्य आजारांचा धोका दुसरीकडे देशात झालेला मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव आणि त्यात कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
वाचा