(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : पॅरोलवर गेलेले 120 कैदी 'रफूचक्कर', माहिती अधिकारातून उघड
नागपूर मध्यवर्ती कारागृहात जानेवारी 2020 ते मे 2022 या कालावधीत पॅरोलवर सोडण्यात आलेल्या 493 कैद्यांपैकी फक्त 373 कैदी परत आले आहे. यापैकी 120 कैदी 'रफूचक्कर' झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
नागपूरः नागपूर मध्यवर्ती कारागृहातून 2020 ते 2022 या कालावधीत पॅरोलवर सोडण्यात आलेल्या 493 कैद्यांपैकी फक्त 373 कैदी परत आले आहे. यापैकी 120 कैदी 'रफूचक्कर' झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. यापैकी अनेक कैदी गंभीर गुन्ह्यातील आहेत, हे विशेष.
जानेवारी 2020 ते मे 2022 या कालावधीत किती कैद्यांना पॅरोल मंजूर झाला व किती कैदी परत आले. किती कैद्यांचा या कालावधीत मृत्यू झाला इत्यादी माहिती माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे विचारणा केली होती. या काळात कारागृहात 9 हजार 155 नवीन कैदी आले तर 8 हजार 461 कैद्यांना जामीन मिळाला किंवा त्यांची सुटका झाली.
15 कैद्यांचा मृत्यू
मागिल 29 महिन्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहात 15 कैद्यांचा मृत्यू झाला. विविध कारणांमुळे हे मृत्यू झाले असले तरी नातेवाईकांकडून विविध दोषारोपदेखील करण्यात आले होते.
खर्चात 69 टक्क्यांनी वाढ
तीनच वर्षांत कारागृहातील कैद्यांवरील खर्चात 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019-20मध्ये कैद्यांवर 2 कोटी 51 लाख 63 हजार 780 रुपये खर्च झाले होते. 2020-21 मध्ये हा आकडा 3 कोटी 11 लाख 50 हजार 812 वर गेला. तर 2021-22 मध्ये खर्चाचा आकडा सर्वाधिक 4 कोटी 24 लाख 99 हजार इतका होता.
मे 2022 पर्यंत बंदीस्त असलेले बंदी
विदेशी बंदी 04
न्याय. चौकशी अधिन बंदी 991
302 न्यायाधिन बंदी 563
एमपीडीएबंदी 18
सश्रम कारावास शिक्षाबंदी 347
एनडीपीएस शिक्षाबंदी 23
जन्मठेप शिक्षाबंदी 420
मृत्यूदंड शिक्षाबंदी 08
एनडीपीएस न्यायाधिन बंदी 126
लालपट्टी (भगोडा) बंदी 30
मोका न्यायाधिन बंदी 162
नक्षलवादी बंदी 77
रात्रपहारेकरी 19
सिद्धदोष अन्वेक्षक (वॉर्डर)13
खुले कारागृह शिक्षाबंदी 29
एकूण बंदीसंख्या 2830