(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NMC News : ऑनलाईन शिक्षणासाठी दिलेले, मनपा शाळेतील 1100 टॅब गहाळ?
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी मनपाच्या 28 शाळेतील 1800 विद्यार्थ्यांना टॅब दिले. निकाल लागल्यानंतर हे टॅब शाळेकडे परत करून ते मनपा शिक्षण विभागात जमा करणे आवश्यक होते.
नागपूर: महानगर पालिकेच्या शाळांचा दर्जा वाढावा व कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता यावा, या उद्देशाने मनपा शाळेतील 10 वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले. मनपाने वाटलेल्या 1800 टॅब पैकी 400 टॅब खराब झाले, काही गहाळ झाले आणि 300 परत आले. त्यामुळे उर्वरीत 1100 टॅब गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयातून ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मनपा शाळेत गरीब विद्यार्थी शिकत असल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी टॅब वितरणाचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या शिक्षण विभागाने 28 शाळेतील 1800 विद्यार्थ्यांना टॅब दिले. 10 वी व 12वीचा निकाल लागल्यानंतर हे टॅब शाळेकडे परत करून ते मनपा शिक्षण विभागात जमा करणे आवश्यक होते. मनपाकडून टॅब देण्यात आले तरी सीमकार्ड व इंटरनेटची सुविधा न दिल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला नाही.
40 गहाळ तर 52 तुटले
मागील वर्षी ऑनलाईन शिक्षणासाठी हे टॅंब देण्यात आले होते. ज्यांना टॅब देण्यात आले होते त्यातील अनेकांनी ते शाळेत परत केले नाही. त्यामुळे शिक्षण विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत. ज्या कंपनीला टॅब खरेदीचे कंत्राट देण्यात आले होते त्या कंपनीला याबाबत विचारणा केली जाणार असून तसे पत्र महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 टॅब गहाळ झाले तर 52 टॅब तुटले आहेत.
खरेदी प्रक्रियेची चौकशी करणार
काही टॅब गहाळ झाले आहे. यामुळे प्रत्यक्षात टॅब खरेदीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात ओह. टॅब खराब झाले, गहाळ केले याबाबतची चौकशी केली जाणार आहे. मात्र तब्बल 400 टॅब खराब झाल्याने मनपाला पुन्हा एकदा खरेदी करावी लागणार आहे. एकंदरीत या टॅब खरेदी प्रक्रियेची चौकशी केली जाणार आहे.
कंत्राटदाराव मेहरनजर
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही टॅब खराब झाल्यावर त्याची दुरुस्ती वेळेत करुन देणे कंत्राटदाराकडून अपेक्षित असताना मनपाच्यावतीने कंत्राटदाराला पाठीशी घालण्यात आले. तसेच पुन्हा अशाच प्रकारे सेटिंग करुनच कंत्राचदाराला टॅप पुरवठ्याचे काम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.