Mumbai Rains : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक तासाभराच्या खोळंब्यानंतर पुन्हा सुरु
LIVE
Background
मुंबई : रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे. मुंबई शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगर, पालघरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हिंदमाता, सायन, गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला आणि कुर्ला वेस्ट या सखल भागात पुन्हा पाणी साचलं आहे.
खरंतर गुरुवारी आणि शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसाने काल मुंबईत उघडीप घेतली होती. त्यामुळे पावसाच्या त्रासापासून मुंबईकर वाचले होते. मात्र आता पुन्हा पावसाची संततधार सुरु झाल्याने सखल भागात पुन्हा पाणी साचलं आहे.
मुंबईची लाईफलाईन मंदावली
या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या लाईफलाईनवरही झाला आहे. पावसामुळे लोकल सेवा मंदावली आहे. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे, तर हार्बर मार्गावरील गाड्या 10 मिनिटं उशिराने धावत आहेत. तसंच पश्चिम रेल्वेच्या लोकल 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. पावसामुळे सायन- माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे रुळावर पाणी आलं आहे. याशिवाय पावसामुळे ट्रॅकवर पाणी आल्याने पालघर स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्या रखडल्या आहे.
वलसाड फास्ट पॅसेंजर फ्लाईंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरला मध्यरात्री येणारी अवध एक्स्प्रेस पहाटे पोहोचली आहे.
मुसळधार पावसामुळे पालघर जलमय
मुसळधार पावसामुळे पालघर जलमय झालं आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पालघर ते सफाळे, तलासरी ते उंबरगाव आणि बोईसर ते पालघर हे सर्व रस्ते बंद झाले आहेत. दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर पाहायला मिळतं आहे.