Dobaaraa Review: भूतकाळ बदलण्याच्या नादात वर्तमानच बदलणारा तापसी पन्नूचा ‘दोबारा’!
Dobaaraa Review: 'दोबारा' (Do Baaraa) चित्रपटाची कथा टाईम ट्रॅव्हलसोबतच 26 वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचे गूढही उकलते, ज्यामुळे सस्पेन्स आणि थ्रिल शेवटपर्यंत टिकून राहतो.
अनुराग कश्यप
तापसी पन्नू, पावेल गुलाटी, शाश्वत चॅटर्जी, विदुषी मेहरा, राहुल भट्ट, हिमांशी चौधरी
Dobaaraa Review: दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kahsyap) याचा नवा चित्रपट 'दोबारा' (Do Baaraa) नुकताच रिलीज झाला आहे. ‘दोबारा’ हा चित्रपट 2018चा स्पॅनिश चित्रपट 'मिराज'चे अधिकृत रिमेक आहे. लेखक निहित भावेने या कथेचे रुपांतर केले आहे. बॉलिवूड स्टार तापसी पन्नू (Taapsee Pannu), पावेल गुलाटी (Pavail Gulati), शाश्वत चॅटर्जी (Saswata Chatterjee), विदुषी मेहरा (Vidushi Mehra), राहुल भट्ट (Rahul Bhat) आणि हिमांशी चौधरी (Himanshi Chaudhary) यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. मात्र, या चित्रपटाच्या कथानकाचे कौतुक होत आहे.
या चित्रपटातून तापसी पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. टाईम ट्रॅव्हलवर आधारित कथा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे अनुराग कश्यपचा चित्रपट असूनही यात अपशब्दांचा वापर झालेला नाही.
26 वर्षांनंतर पुन्हा एकदा वादळ येतं अन्...
‘दोबारा’ची कथा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दशकांमध्ये घडत आहे. एकीकडे 1996चा काळ सुरु आहेत, तर दुसरीकडे 2021 सुरु आहे. एकाच वेळी एकच व्यक्ती या दोन्ही वेळेत वावरतेय. कथानकाची सुरुवात होते ती एका वादळाने, या वादळाने संपूर्ण शहराला घेरलं आहे. यातच एक अनय नावाचा लहान मुलगा घराबाहेर पडतो आणि पुन्हा कधीच घरात परतत नाही. त्याचा मृत्यू होतो. यानंतर कथा येते 2021मध्ये... या काळात अनयच्या रिकाम्या घरात एक नवीन फॅमिली राहायला येते. अंतरा (तापसी पन्नू) आपला पती विकास आणि मुलीसोबत या घरात शिफ्ट होते. या घरात आजही काही जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत. यात त्यांच्या टीव्हीचा देखील समावेश आहे.
अनयला जाऊन आता 26 वर्ष लोटली आहेत. मात्र, 26 वर्षानंतर पुन्हा एकदा तेच वादळ आलंय. या वेळी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी तापसी घरात असलेला तो जुना टीव्ही सुरु करते. अचानक या टीव्हीत 26 वर्षांपूर्वीचा अन्य दिसू लागतो. या धक्क्यातून प्रेक्षक सावरतातच की, आणखी एक धक्का बसतो, तो म्हणजे अनय देखील पलीकडून अंतराला टीव्हीमध्ये पाहू शकतोय. या टीव्हीद्वारे ते दोघे एकमेकांशी बोलू शकतात. यानंतर अंतराला अनयने पाहिलेला खून आणि त्याचा अपघाती मृत्यू याबद्दल माहिती मिळते. त्या क्षणी ती अनयला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून भूतकाळ बदलण्याचा प्रयत्न करते. मात्र, यातच तिचा संपूर्ण वर्तमानकाळ बदलून जातो. आता तिच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावाच लागेल. एकंदरीत या चित्रपटाची कथा आणि यातील दृश्य अगदीच जिवंत वाटतात आणि पाहणारा प्रेक्षक त्यात गुंतून पडतो.
का बघाल?
स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक असूनही, त्यात अनुराग कश्यपची स्टाईल पाहायला मिळते. नेहमीप्रमाणे, अनुरागने यातील स्त्री पात्रांना सशक्त बनवले आहे. चित्रपटाची कथा टाईम ट्रॅव्हलसोबतच 26 वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचे गूढही उकलते, ज्यामुळे सस्पेन्स आणि थ्रिल शेवटपर्यंत टिकून राहतो. या चित्रपटाला आणखी रंजक बनवण्यासाठी काही ठिकाणी विनोदी संवादांचा वापरही करण्यात आला आहे. त्यामुळे हा थरार एकदा चित्रपटगृहात जाऊन नक्कीच अनुभवायला हवा!