Almost Pyaar with DJ Mohabbat : प्रेमाची नवी परिभाषा सांगणारा 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे'
Almost Pyaar with DJ Mohabbat : 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' या सिनेमाची कथा दोन दशकांभोवती फिरणारी आहे.
Anurag Kashyap
अलाया एफ, करण मेहता, विक्की कौशल
Almost Pyaar with DJ Mohabbat Review : प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपला (Anurag Kashyap) ओळखलं जातं. तो नेहमीच त्याच्या सिनेमांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो. नुकताच अनुरागचा 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' (Almost Pyaar with DJ Mohabbat) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डार्क सिनेमांची बांधणी केल्यानंतर अनुरागने प्रेमाची नवी परिभाषा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' या सिनेमाची कथा दोन दशकांभोवती फिरणारी आहे. दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी त्या एकमेकांशी सांगड घालणाऱ्या आहेत आणि या दोन गोष्टींना जोडणारा धागा म्हणजे विकी कौशल. या सिनेमात विकीने डीजे मोहब्बत ही भूमिका साकारली आहे.
'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' या सिनेमाचं कथानक काय आहे?
'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' या सिनेमाचं कथानक अमृता नावाच्या एका मुलीभोवती फिरणारं आहे. अमृता ही डलहौजीत येथील रहिवासी असून एक सोळा वर्षांची शालेय विद्यार्थिनी आहे. अमृता ही लोकप्रिय लेखिका अमृता प्रीतम यांच्या विचारांचा आदर करणारी आहे. तसेच ती डीजे मोहब्बत आणि त्याच्या गाण्यांवर प्रेम करणारी आहे. तिला डीजे मोहब्बतच्या कॉन्सर्टबद्दल कळतं आणि घरी काहीही न सांगता ती 21 वर्षीय याकूबसोबत घरातून पळून जाते. घरातून पळून गेल्यामुळे तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे सिनेमात दाखवण्यात आले आहे.
'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' या सिनेमाच्या कथानकातील दुसरा भाग हा लंडनमध्ये राहणाऱ्या एका श्रीमंत वडिलाच्या लेकीवर म्हणजे आयशाच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. एका कॉन्सर्टदरम्यान आयशा हरमीत नावाच्या डीजेवाल्याच्या प्रेमात पडते. हरमीतला त्याच्या करिअरवर फोकस करायचं असतं. पण आयशातचं एकतर्फी प्रेम त्यालादेखील प्रेमात पाडतं. हरमीतसाठी आयशा खोटं बोलायला लागते. डीजे मोहब्बत अर्थात विकी कौशल (Vicky Kaushal) हा 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' या सिनेमाचा केद्रंबिंदू आहे. लंडनमध्ये राहणारा लोकप्रिय डीजे चंबाच्या कॉन्सर्टची अमृता आणि याकूब दोघांनाही ओढ असते. आता डीजे मोहब्बतपर्यंत अमृता आणि याकूब कशा पोहोचतात हे या सिनेमात कळेल.
'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा अनुराग कश्यपने सांभाळली आहे. या सिनेमातील दोन्ही दशकांची बांधणी अनुरागने खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. या सिनेमातील गाणीदेखील लक्ष वेधून घेणारी आहेत. तरुणांना भावणारा असा हा सिनेमा आहे.