(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Leo Review : प्रभाव न पाडणारा विजयचा लियो
Leo Review : थलापती विजयचा (Thalapathy Vijay) लियो (Leo) एकदा पाहाण्यासारखा आहे. मात्र त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवाल तर मात्र अपेक्षाभंग होईल.
लोकेश कनागराज
थलापति विजय, संजय दत्त, तृषा कृष्णन
Thalapathy Vijay Leo Movie Review : दक्षिणेतील चित्रपट असतात साध्याच कथेवर, पण त्यात ते नाट्य असे भरतात की आपण शेवटपर्यंत चित्रपट पाहण्यास बाध्य होतो. गेली अनेक वर्षे दक्षिण भारतीय चित्रपट पाहिले असल्याने त्यांचा एक पॅटर्न ठरलेला आहे हे अनेकदा जाणवते. आणि विजयचा (Thalapathy Vijay) लियो (Leo) बघतानाही तो पॅटर्न पहिल्या फ्रेममधूनच जाणवू लागतो. अर्थात हिंदीमध्ये तीन दशकांपूर्वी आलेल्या अमिताभ बच्चनचा (Amitabh Bachchan) 'हम' अशाच पॅटर्नवरचा चित्रपट होता. मात्र विजयचा लियो त्याची कॉपी आहे असे नाही हे अगोदरच स्पष्ट करतो. फक्त पॅटर्न कसा सारखा आहे ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र अशा ठरलेल्या पॅटर्नवरही प्रेक्षकांना गुंगवून ठेवणारा चित्रपट काढणे सोपे नसते. अनेकदा चित्रपटाचा नायक सुरुवातीला कुटुंबवत्सल दाखवलेला असतो, मात्र त्याचा भूतकाळ वेगळा असतो. त्या भूतकाळाला थोडीशी रहस्याची फोड देऊन तयार करण्यात आलेला 'लियो' तुमचे मनोरंजन आरामात करतो. आणि पडद्यावर ते पाहात राहावेसेही वाटते.
'लियो' चित्रपटाची कथा सुरु होते हिमाचलच्या एका गावात जेथे एका तरसाने धुमाकूळ माजवलेला आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु असतात अखेर पार्थिबन (विजय) नावाच्या व्यक्तीची मदत घेऊन तरसाला पकडले जाते आणि संपूर्ण गाव सुटकेचा निश्वास टाकते. पार्थिबनचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असते. पार्थिबनचे एक कॉफी शॉपही असते. येथून सुरु होते पार्थिबनची कथा. त्या गावात चोरांची एक टोळी येते. ती टोळी पार्थिबनच्या कॉफी शॉपमध्ये चोरीच्या उद्देशाने शिरते. पार्थिबन त्या सगळ्यांना मारतो. त्याच्यावर खटला भरला जातो, पण स्वसंरक्षणार्थ त्याने हल्ला केल्याचे न्यायालयात सिद्ध होते आणि पार्थिबन सुटतो. मात्र पार्थिबनने मारलेल्या गुन्हेगारांचे इतर मित्र पार्थिबनला मारण्यासाठी येतात. तो त्यांनाही मारतो, त्यावेळी त्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून येतो आणि कथेला वळण मिळते.
पार्थिबनचा फोटो पाहून अँथनी दास (संजय दत्त) हिमाचलमध्ये येतो. याचे कारण म्हणजे त्याचा मुलगा लियो दास पार्थिबनसारखा दिसत असतो. काही वर्षांपूर्वी लियो आगीत जळून मेल्याचे म्हटले जात असते मात्र पार्थिबनला पाहून अँथनीला वाटते की लियो मेलेला नसून तो पार्थिबन म्हणूनच राहात आहे.
पार्थिबनने तो लियो आहे हे क़बूल करावे म्हणून अँथनी खूप प्रयत्न करतो. शेवटी काय होते ते जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे. चित्रपटाचा सिक्वेल नक्की येणार असून या चित्रपटाती त्याच्या खुणा अनेक ठिकाणी दाखवून दिलेल्या आहेत.
विजयने दोन मुलांचा बाप असलेल्या कुटुंबवत्सल हतबल पार्थिबनची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. त्याने पार्थिबनची भूमिका खूपच उत्कृष्टरित्या साकारली आहे. विजय साऊथचा सुपरस्टार असून त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेले आहेत. या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या खूपच अपेक्षा असून त्यांनी चित्रपटाला चांगला प्रतिसादही दिला आहे.
अन्य भूमिकांमध्ये अँथनी दासच्या भूमिकेत संजय दत्तने प्रभाव पाडलेला आहें. दक्षिणेतील अभिनेत अर्जुनने पार्थिबनच्या काकाची हेरॉल्ड दासची भूमिका नेहमीप्रमाणे साकारली आहे. दक्षिणेतील नायक खलनायकाच्या भूमिकाही साकारण्यात चुकीचे मानत नाहीत. अर्जुन असाच नायक आहे. त्रिशा कृष्णने पार्थिबनच्या पत्नीची सत्याची भूमिका ठीकठाक साकारली आहे. त्याच्या मुलाच्या सिद्धार्थच्या भूमिकेत मॅथ्यू थॉमसने आणि मुलीच्या चिंटूच्या भूमिकेत इयालने काम केले आहे.
चीनी चित्रपट हिस्ट्री ऑफ व्हायोलन्सवर आधारित हा चित्रपट असून चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. अशा प्रकारचे चित्रपट तयार करण्यात त्याचा हातखंडा आहे. गेल्या वर्षी आलेल्या कमल हसन अभिनीत विक्रमचेही दिग्दर्शन त्यानेच केले होते. विजयच्या मास्टरचेही दिग्दर्शन त्याचेच होते. विशेष म्हणजे तो आपले चित्रपट एकमेकात चांगले गुंफतो हे त्याने कैथी आणि विक्रममधून दाखवून दिले आहे. लियोमध्येही त्याने त्याच्या काही चित्रपटांची पेरणी केली असावी आणि हे त्याच्या पुढील चित्रपटांवरून समोर येऊ शकेल. लियोचे दिग्दर्शन त्याने चांगल्या प्रकारे केलेले आहे. अनिरुद्ध रविचंद्रनचे संगीत चांगले आहे. ब्लडी स्वीट गाणे चांगले बनले आहे. इतर गाणीही ठीकठाक आहेत. एकूणच लियो एकदा पाहाण्यासारखा आहे. मात्र त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवाल तर मात्र अपेक्षाभंग होईल.