Bloody Daddy Review : जबरदस्त अॅक्शनने भरलेला शाहिद कपूरचा 'ब्लडी डॅडी'
Bloody Daddy : शाहिद कपूरचा 'ब्लडी डॅडी' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अली अब्बास जफर
शाहिद कपूर , डायना पेंटी , रोनित रॉय , राजीव खंडेलवाल, संजय कपूर
Bloody Daddy : बॉलिवूड सिने-निर्माते अनेक फ्रेंच सिनेमांकडे आकर्षित होतात. 'भेजा फ्राय', 'डू नॉट डिस्टर्ब', 'हे बेबी', 'नौटंकी साला', 'शंघाई', 'तेरा सुरुर', 'कारतूस' सारखे अनेक सिनेमे फ्रेंच सिनेमांवर आधारित आहेत. आता अली अब्बर जफर दिग्दर्शित प्रेक्षकांच्या भेटीला आलेला शाहिद कपूरचा 'ब्लडी डॅडी' (Bloody Daddy) हा सिनेमा 2011 साली आलेल्या 'स्लीपलेस नाईट' या फ्रेंच सिनेमाचे रुपांतर आहे. या सिनेमावर तामिळमध्ये 'तुंगा वनम' हा सिनेमा बनवण्यात आला होता. 'तुंगा वनम'मध्ये कमल हासन आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत होते.
'ब्लडी डॅडी' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. हा सिनेमा फ्रेंच सिनेमा 'नाइट ब्लँके' उर्फ 'स्लीपलेस नाईट' या सिनेमाचा रिमेक असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. 'ब्लडी डॅडी' या सिनेमाची सुरुवात एनसीबी अधिकारी सुमेर (शाहिद कपूर) आणि ड्रग पेडलर्स यांच्यातील शर्यतीने होते. तो ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करू शकेल का आणि आपल्या मुलाबद्दलची जबाबदारी पार पाडू शकेल का? अशी या सिनेमाची गोष्ट आहे. 'ब्लडी डॅडी' या सिनेमात शाहिद कपूरसह संजय कपूर, रोनित रॉय, राजीव खंडेलवाल, डायना पेंटी, विवियन भथेना, झीशान कादरी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
शाहिद कपूरने एनसीबी अधिकारीची भूमिका चोख बजावली आहे. तर दुसरीकडे 'गुंडे', 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक अली अब्बास जफर हे 'स्लीपलेस नाईट' सारख्या फ्रेंच सिनेमाचा रिमेक बनवण्यात यशस्वी झाले आहेत. दर्जेदार कथानक आणि उत्कृष्ट कलाकारांसह एक कमाल सिनेमा बनवण्यात त्यांना यश आलं आहे.
'ब्लडी डॅडी' या सिनेमाचं कथानक काय? (Bloody Daddy Movie Story)
'ब्लडी डॅडी' या सिनेमाचं कथानक वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. शाहिद कपूरने पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. एकट्याने तो त्याच्या मुलाचा सांभाळ करत आहे. 'ब्लडी डॅडी' या सिनेमाची कथा ड्रग्सभोवती फिरते. या सिनेमात रोनित रॉयदेखील आहे. शाहिद कपूरला कोकेनने भरलेली बॅग सापडते. त्यानंतर कोणीतरी जॅकपॉट मिळाला असं त्याला सांगतो आणि त्याला बॅग ठेवण्यासही सांगतो. शाहिद बॅग ठेवतो, त्यानंतर रोनित रॉय त्याला कॉल करतो आणि बॅग आपली असल्याचे सांगतो. तो शाहिदला सांगतो की ये माझे सामान दे आणि तुझ्या मुलाला घेऊन जा. त्यानंतर या सिनेमात अभिनेता संजय कपूरही दिसणार आहे. या सिनेमात तो मुख्य भूमिकेत आहे. कोकेनच्या पिशवीपासून सुरू झालेल्या या कथेत अनेक धक्कादायक वळणे आहेत. त्यामुळे सिनेमा आणखी मजेशीर होतो.
सिकंदर आणि हमीदच्या भूमिकेत रोनित रॉय आणि संजीव कपूर यांनी उत्तम काम केलं आहे. डायना पेंटीने एक अधिकारी म्हणून सिनेमात कौतुकास्पद काम केलं आहे. या सिनेमात शाहिद कपूर 'देसी जॉन विक' सारखा दिसत आहे, त्याने आपल्या कूल लुक आणि अॅक्शनने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोनितने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केलं आहे. संजय कपूर सिनेमात फारसा दिसला नसला तरी त्याने चांगलं काम केलं आहे.
सिनेमाचा पहिला भाग खूपच मजेशीर आहे. पण दुसऱ्या भागातील शाहीर कपूर आणि राजीव खंडेलवाल यांचे अॅक्शन सीन्स पाहण्यासारखे आहेत. सिनेमाची पटकथा खूपच चांगली आहे. अली अब्बास जफरचे दिग्दर्शन नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट आहे. आदित्य बसू आणि सिद्धार्थ-गरीमा यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे.