Afwaah Review : सोशल मीडियाच्या राक्षसाची टोकदार कथा 'अफवाह'
गुंडापासून वाचण्यासाठी निवी रहाबच्या गाडीत बसते आणि दोघे जीव वाचवम्यासाठी पळून जातात. आणि मग सुरु होतो अफवांचा बाजार.
सुधीर मिश्रा
भूमी पेडणेकर, नवाजुद्दीन सिद्दीकी, सुमित व्यास
Afwaah Review : सध्या जवळ जवळ प्रत्येकाच्याच हातात स्मार्ट फोन आहे. प्रत्येकाचेच ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट आहेत. दिवसाला लाखों व्हीडियो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आदळत असतात. यापैकी काही कामाचे असतात तर काही अक्षरशः कसलीही शहानिशा न करता सोशल मीडिया यूनिव्हर्सिटीचे पदवीधरांनी पुढे ढकलले म्हणजेच फॉरवर्ड केलेले असतात. आपण जो व्हीडियो पाहतोय तो खरा आहे की नाही याची काहीही खातरजमा अनेक जण करीत नाहीत. यामुळे अनेकदा वादग्रस्त व्हीडियो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात आणि त्यामुळे समाजात दुही निर्माण होऊन दंगे होतात. गेल्या काही काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. स्मार्ट फोन हातात आला म्हणून डोकं बाजूला ठेऊन स्मार्टपणा दाखवायचा नसतो, पण सोशल मीडिया यूनिव्हर्सिटीच्या पदवीधरांना हे कोण सांगणार?
सध्या अनेक राजकीय पक्षांनी स्वतःची सोशल मीडिया टीम लाखो रुपये फी देऊन तयार केलीय. ही टीम त्या पक्षाच्या, नेत्याच्या पोस्ट स्वतः तयार करून पक्षाच्या अधिकृत हँडलवर टाकतात तर काही जण फेक अकाउंट निर्माण करून आपण ज्याचं मीठ खातोय त्याला फायदा होईल अशा प्रकारचे खरे व्हिडियो एडिट करून खोट्या पोस्ट तयार करतात आणि सोशल मीडियावर व्हायरल करतात. यामुळे समाजाचं किती नुकसान होतं याचा कोणीही विचार करीत नाही. तसेच पसरवलेली अफवा कधी कधी आपल्याच घराचं वाटोळं करील याचा विचारही अफवा पसरवणारे करीत नाहीत.
सुधीर मिश्रा नावाचा दिग्दर्शक तुम्हाला ठाऊक असेलच. जाने भी दो यारो, इस रात की सुबह नहीं, हजारों ख्वाहिशें ऐसी, धारावी असे उल्लेखनीय चित्रपट ज्या दिग्दर्शकाच्या नावावर आहेत तो दिग्दर्शक म्हणजे सुधीर मिश्रा. १९८३ च्या जाने भी जो यारोपासून आतापर्यंत सुधीर मिश्रा यांनी २०-२२ चित्रपट तयार केले असतील. याच सुधीर मिश्रांचा नेटफ्लिक्सवर अफवाह चित्रपट रिलीज झालाय. चित्रपट पाहिल्यानंतर सुधीर मिश्रा किती दर्जेदार दिग्दर्शक आहे हे पुन्हा एकदा जाणवले. अफवाह पाहिला आणि त्यामुळेच स्मार्ट फोन, सोशल मीडिया, राजकीय पक्षांची प्रकर्षाने आठवण झाली. कोणी तरी एक अफवा पसरवतो आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचे कसे हाल होतात आणि राजकीय पक्ष त्याचा कसा फायदा घेतो ते अफवाह चित्रपटात सुधीर मिश्रा यांनी टोकदारपणे दाखवले आहे. राजस्थानमधील संबलपुर नावाचे एक गाव आहे. त्या गावात विक्की सिंह (सुमित व्यास) निवडणुकीला उभा आहे. प्रचारादरम्यान राजकीय फायद्यासाठी सुमित स्वतःच स्वतःवर हल्ला करवून घेतो. मात्र या हल्ल्यामुळे दोन समाजात वितुष्ट निर्माण होते. दंग्याचा व्हीडियो सोशल मीडियावर व्हायरल केला जातो, दंगे होतात. निष्पाप मारले जातात. राजकीय लाभासाठी सुमितने विरोधी पक्षाच्या नेत्याच्या मुलीसोबत निवीसोबत (भूमी पेडणेकर) साखरपुडा केलेला असतो आणि लवकरच लग्न करणार असतात. निवीचे नात्र दुसऱ्याच तरुणावर प्रेम असते. सुनितचं राजकारण न आवडल्याने निवी घर सोडून पळून जाते. याच दरम्यान अमेरिकेतील नोकरी सोडून रहाब अहमद (नवाझुद्दीन सिद्दीकी) भारतात आलेला असतो. तो पत्नीच्या एका एक्झिबिशनसाठी जात असतो. रस्त्यात त्याला सुमितचे गुंड निवीला जबरदस्तीने पकडून घेऊन जाताना दिसतात. निवीला वाचवण्यासाठी रहाब पुढे येतो. गुंडापासून वाचण्यासाठी निवी रहाबच्या गाडीत बसते आणि दोघे जीव वाचवम्यासाठी पळून जातात. आणि मग सुरु होतो अफवांचा बाजार.
लव्ह जिहाद, गोवंशचा फायदा सोशल मीडियावर कसा केला जातो, त्यामुळे या दोघांचे जीव कसे टांगणीला लागतात. त्यातून ते कसा मार्ग काढतात त्याची कथा म्हणजे अफवाह हा चित्रपट. सुधीर मिश्रांनी अफवाहमध्ये इस रात की सुबह नहीं चित्रपटाच्या धर्तीवरच एका रात्रीची कथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटात अनेक उणीवा आहेत. गावाची लोकसंख्या, क्षेत्रफळ काय आहे ते समजत नाही. रहाब आणि निवीचा प्रवास नक्की कुठून कुठे चाललाय, इन्स्पेक्टर कसा लगेचच पोहोचतो, निवी आणि रहाब ज्या ट्रकमधून जात असतात तो ट्रक नक्की कुठे आणि कसा चाललाय तो संबलपुरपासून किती लांब आहे, सुमित गाडीने कसा योग्य ठिकाणी पोहोचतो असे अनेक प्रश्न चित्रपट पाहाताना मनात उद्भवतात. पण त्यामुळे चित्रपटाचा टोकदारपणा कमी होत नाही. चित्रपटाच्या शेवटी पोलिसांनी पकडलेल्या ट्रकमधून गाढवं बाहेर पडतात. त्यातून सुधीर मिश्रांना थेट संदेश देतात की, डोळे झाकून सोशल मीडियाचा वापर करणारे गाढवांपेक्षा कमी नाहीत. हा खास सुधीर मिश्रा टच म्हणावा लागेल. तसंच क्लीन शेव्ह असलेला रहाबही दाढी न करण्याचा निर्णय घेतो तेसुद्धा एक प्रतीकच आहे. एकूणच चित्रपटात प्रत्येक जण स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांचा वापर करीत असल्याचे चांगल्या प्रकारे सुधीर मिश्रांनी दाखवले आहे. चित्रपटाचे लेखन सुधीर मिश्रा, निसर्ग मेहता, शिवशंकर वाजपेयी आणि अपूर्व धर बडगैया या चौघांनी मिळून लिहिलेली आहे.
कलाकारांमध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीने नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट म्हणता येणार नाही पण ठीक अभिनय केला आहे. अफवेमुळे संकटात सापडलेल्या पण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारा रहाब त्याने चांगल्या प्रकारे साकारला आहे. मुळात त्याची भूमिका नीट लिहिलेली गेली नसल्याने नवाझही जादू दाखवू शकला नाही. निवीच्या भूमिकेत भूमी पेडणेकर प्रमुख भूमिका असूनही प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरली आहे. अन्य कलाकारांंमध्ये सुमित व्यासने चांगली भूमिका केली आहे तर, चंदन बनलेला शारीब हाशमी प्रभावित करतो, आईच्या सांगण्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला शरीर सोपवणारी महिला पोलीस टी. जे. भानूने चांगल्या प्रकारे साकारली आहे. राजस्थानी लोकगायक मामे खां आणि सुनेत्रा बॅनर्जी यांच्या आवाजातील आज ये बसंत में गहरा असर है गाणे चित्रपटाची कथा पुढे नेणारे आहे.
सोशल मीडियाची भयावहता जाणून घ्यायची असेल तर अवश्य हा चित्रपट पाहा. आणि त्यानंतर स्वतःच्या मोबाईलवर आलेल्या व्हीडियोवर त्याची सत्यता पाहूनच विश्वास ठेवा.