World Diabetes Day 2023 : तुम्हीही सकाळचा नाश्ता न करण्याची चूक करताय का? तुमची ही सवय मधुमेहाला देऊ शकते आमंत्रण
World Diabetes Day 2023 : संपूर्ण दिवसभरात सकाळचा नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा असतो.
World Diabetes Day 2023 : भरपूर पोषणयुक्त आहार आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतो. पण, ज्या वेगाने जीवनशैली (Lifestyle) बदलत आहे त्यानुसार आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी देखील बदलत चालल्या आहेत. धावपळीचं जीवन आणि कामाचा वाढता ताण यामुळे अनेकजण सकाळचा नाश्ता करायचा अनेकदा टाळतात. तर, काही लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता स्किप करतात. पण तुम्हाला माहित आहे का की सकाळचा नाश्ता न करणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. खरंतर संपूर्ण दिवसभरात सकाळचा नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा असतो. सकाळी नाश्ता केला नाही तर मधुमेहासारख्या (Diabetes) गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते. जे लोक सकाळचा नाश्ता करत नाहीत त्यांना हृदयविकार आणि मधुमेहासारखे गंभीर आजार होऊ शकतात. आहारतज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता चयापचय प्रक्रियेसाठी देखील खूप महत्वाचा आहे. चला जाणून घेऊयात सकाळी नाश्ता न केल्याने काय नुकसान होऊ शकते.
सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा आहे?
सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि पोटभर असेल तर आरोग्य चांगले राहते, असे अनेक अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, जे लोक सकाळचा पौष्टिक नाश्ता करतात त्यांना वजनाचा त्रास होत नाही आणि लठ्ठपणाही वाढत नाही. यामुळे अनेक दिर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही नाश्ता सोडला तर इतर गोष्टी खाण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळू लागतात. या सवयींमुळे इन्सुलिन स्पाईक देखील होऊ शकतात. त्यामुळे मधुमेह होऊन शरीरातील चरबी वाढू शकते.
हृदयविकाराच्या झटक्याचा धोका
जामा जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, इतरांच्या तुलनेत सकाळी नाश्ता न करणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 27% जास्त असतो. यामुळे अनेक हृदयविकारही वाढू शकतात.
मधुमेहाचा धोका
हार्वर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार, 6 वर्षे चाललेल्या एका संशोधनात 46,289 महिलांचा समावेश करण्यात आला होता. ज्याचा निकाल आश्चर्यकारक आढळून आला. ज्या महिलांनी नाश्ता केला नाही त्यांना टाईप-2 मधुमेहाचा धोका जास्त असल्याचे आढळून आले. याचे कारण इन्सुलिन स्पाइक आणि जास्त वजन होते.
तज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञांच्या मते, नाश्ता शरीरातील ऊर्जा पातळी राखून ते सक्रिय बनवते. यामुळे ग्लुकोजचा पुरवठा होतो आणि आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे, कोशिंबीर, दूध आणि इतर पौष्टिक गोष्टींचा समावेश असेल तर तुम्ही अनेक आजार टाळू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :